पिंपरी : विस्कळीत, अपुऱ्या, अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींनंतर आता समाविष्ट भागांतून दूषित पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून मोशी, दिघी, चऱ्होली, चिखली, जाधववाडी या भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. दोन दिवसांत स्वच्छ पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आंद्रा धरणातील ८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेते. हे पाणी धरणातून इंद्रायणी नदीत सोडले जाते. नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून महापालिका अशुद्ध पाणी उचलते. तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तिथे पाण्यावर प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे जलकुंभात (टाक्या) पाणी सोडले जाते. जलकुंभातून भोसरी मतदारसंघातील मोशी, दिघी, चऱ्होली, जाधववाडी, चिखली, बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव या भागात पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.

पाण्याचा रंग पिवळसर आहे. दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पाण्याची चव बदलली आहे. त्यामुळे नागरी आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिन्यांची काही ठिकाणी चाळण झाली आहे. असुरक्षित पाणी साठवण टाक्यांमुळे पाणी दूषित येते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिकेचे आरोग्य केंद्र आणि खासगी दवाखान्यांमध्ये संबंधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले. निघोजे बंधाऱ्यांचे सुरू असलेले काम, नदीचे वाढते प्रदूषण यामुळे पाणी प्रदूषित येत असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

प्रयोगशाळेत तपासणी

समाविष्ट भागाला होणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. निगडी येथील प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविले आहेत. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून पाणी पुढे सोडल्यानंतर नेमके पुढे कुठे जाऊन पाणी खराब होत आहे काय, याबाबत तपासणी करण्यासाठी समाविष्ट भागांतील नळतोटीच्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले. त्यात काही भागांतील पाणी पिण्यायोग्य असल्याचे, तर काही भागातील पाणीपुरवठा अशुद्ध असल्याचा अहवाल आला आहे.

निघोजे बंधाऱ्याचे काम सुरू आहे. नदी प्रदूषणामुळे दूषित पाणी येत आहे. पाण्यावर हिरवट छटा येत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी रसायन वापरण्यास मर्यादा आहेत. पाणी स्वच्छतेसाठी उपाययोजना केल्या आहे. दोन दिवसांत फरक पडेल. लोकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले.