पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास अनेक इच्छुक असतील, तर बिघडले कुठे? असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षांतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया दिली. अजित पवार शिरूरमधून इच्छुक असतील तर तुम्हाला त्रास काय आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.
शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबरच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आमदार विलास लांडे यांची नावे चर्चेत आहेत. यासंदर्भात अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. पक्षाचे नेते शरद पवार चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. सक्षम उमेदवार देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा >>> “पुण्यातील काँग्रेस भवन म्हणजे…”, सोशल मीडियावरील पोस्टनंतर भाजप-काँग्रेसमध्ये राडा
पवार म्हणाले की, विलास लांडे पक्षाचे माजी आमदार आहेत. त्यांना खासदारकीची उमेदवारीही दिली होती. त्यावेळी त्यांना अपशय आले होते. त्यांनी आता गोळाबेरीज आणि आकडेमोड केली असेल. त्यामुळे तेही इच्छूक असतील.विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि विलास लांडे यांचे विधाने मी ऐकली आहेत. कोणाला उमेदवारी द्यायची, हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडीत कुठल्या जागा कोणाला वाट्याला येतात, हे प्रथम निश्चित होईल. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणा-या जागेवर सक्षम उमेदवार दिला जाईल.
हेही वाचा >>> पिंपरी महापालिकेचा अजब कारभार; बक्षिसाची रक्कम विद्यार्थ्यांना दिली दोनवेळा
शरद पवार जो निर्णय देतील, तो आम्ही मान्य करेन, असे स्वतः अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. गेल्या निवडणुकीवेळी अमोल कोल्हे शिरूरसाठी योग्य उमेदवार वाटतात, असे सांगून त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. त्यानंतर शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आणि त्यांना निवडूनही आणले, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.