राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यास शासनाने परवानगी दिली असून गेल्या वर्षी कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्य प्राध्यापकांनाही एक वर्ष मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये प्राध्यापकांच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरूही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ती पूर्ण झालेली नाही. गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या कालावधीत कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात आलेल्या प्राध्यापकांची मुदत ३० सप्टेंबरला संपुष्टात आली. मात्र, या कालावधीत नियमित प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण झालीच नाही. त्या पाश्र्वभूमीवर कंत्राट संपलेल्या प्राध्यापकांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या प्राध्यापकांच्या कंत्राटाचे नूतनीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे रिक्त जागांवर कंत्राटी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार आहे.
नियमित नियुक्तीने प्राध्यापक मिळेपर्यंत किंवा अकरा महिने अशा कालावधीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे तंत्रनिकेतनातील विद्यार्थी आणि शिक्षकांनाही दिलासा मिळाला आहे. याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढले आहे.

Story img Loader