वाकड येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा केल्याच्या कारणास्तव हिंजवडी पोलिसांनी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
हरिश्चंद्र जाधव (रा. संजय गांधी वसाहत, पाषाण, पुणे) या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावणकुमार मगळु यादव (वय ३०, रा. युवान बिल्डिंग, बांधकाम साइड, वाकड. मूळ रा. छत्तीसगड), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. वाकड येथील ‘युवान’ या इमारतीत यादव हे पाचव्या मजल्यावर वायरिंगचे काम करीत असताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. १२ जुलै २०१३ रोजी ही घटना घडली होती.
पोलिसांनी या प्रकरणी तपासणी करून हा गुन्हा दाखल केला. बांधकाम होत असलेल्या इमारतीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट आदी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित ठिकाणी ही साधने पुरविण्यात आली नसल्याने हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader