पिंपरी पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीच ठेकेदार असून त्यांनी विकासाच्या नावाखाली मनमानी व भ्रष्ट कारभार चालवला आहे, अशी तक्रार करत शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी, महापालिकेच्या गेल्या १० महिन्यातील सर्व कारभाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पिंपरी पालिकेत ‘ई-टेंडिरग’ असतानाही अनेक कामांमध्ये संगनमत केले जाते. निविदांमध्ये स्पर्धा होत नाहीत. निविदा प्रसिध्द करताना ठेकेदार डोळ्यासमोर ठेवण्यात येतात. याशिवाय, अन्य मोठी कामे त्याच-त्याच ठेकेदारांना देण्यात आली आहेत. स्थायी समितीने अनेक कामांना नियमबाह्य़ मुदतवाढ दिली असून वाढीव दरांच्या निविदा मंजूर केल्या आहेत. स्थायीत कामांच्या फाईली जाणीवपूर्वक रखडवल्या जातात. आयुक्तांकडे तक्रार करून उपयोग होत नाही, त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. महापालिकेतील मोठी कामे घेणाऱ्या संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कारभाराकडे डोळेझाक केली जाते. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या कारभारात लक्ष घालावे व गेल्या १० महिन्यातील कामांची चौकशी करावी आणि चुकीच्या पध्दतीने मंजूर करण्यात आलेली कामे रद्द करावीत, अशी मागणी उबाळे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा