लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : शहरातील १८ मीटरपेक्षा जास्त रुंदी असलेल्या रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीने करणाऱ्या ठेकेदाराने किलोमीटर वाढवण्यासाठी रस्ता साफ न करताच रस्ते सफाई वाहन (रोड स्वीपर) पळवल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने लायन सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महापालिकेमार्फत शहरातील १८ मीटर रुंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफ केले जातात. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. फेब्रुवारीपासून यांत्रिकी पद्धतीने चार विभागांत काम सुरू असून त्यासाठी चार संस्था कार्यरत आहेत. प्रत्येक विभागात दोन मोठी, दोन मध्यम रस्ते सफाई वाहने, दोन हायवा, एक पाण्याचा टँकर अशा वाहनांचा समावेश आहे.
आणखी वाचा-पिंपरी : पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण काढताना पोलिसांनाच मारहाण
या वाहनांचे संचलन करण्यासाठी प्रत्येक विभागात ३२ सफाई कर्मचारी, नऊ वाहनचालक, दहा ऑपरेटर, चार मदतनीस अशा ५५ कामगारांद्वारे कामकाज करणे अपेक्षित आहे. प्रत्येक रस्ते सफाई वाहनाद्वारे दररोज ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे. १८ मीटर व त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते, बीआरटीएस, महामार्गावरील पदपथ आणि सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंची आठवड्यातून तीन वेळा, मुख्य मार्गावरील मधल्या रस्त्याची, रस्त्याच्या कडेच्या भिंतीच्या परिसराची आठवड्यातून एका वेळा साफसफाई करणे आवश्यक आहे.
आणखी वाचा-ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
पुणे-मुंबई रस्त्यावरील दापोडी ते पिंपरी रस्त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी लायन सर्व्हिसेस लि. या कंपनीकडे आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दापोडी ते पिंपरी या रस्त्यावरील कामकाजाची पाहणी केली. रस्तेसफाई करणारे वाहन रस्ता साफ न करताच पळवले जात होते. याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनीला आरोग्य विभागाने नोटीस पाठवून खुलासा मागविला. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीने समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम ठेकेदाराच्या बिलातून वसूल केली जाणार आहे. तसेच यापुढे कामात हलगर्जीपणा आढळल्यास सक्त कारवाईचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.