अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच बांधकाम व्यावसायिक सुधीर मांडके आणि माजी महापौर शांतिलाल सुरतवाला यांनी बाशिंगे बांधून निवडणुकीत पॅनेल उभे करण्याची तयारी सुरू केली आहे!
नाटय़ परिषद पुणे शाखेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली. मात्र, शाखेच्या घटनेनुसार लेखापरीक्षण अहवाल सादर झाल्याखेरीज पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा करता येत नाही. लेखापरीक्षण अहवालाचे काम संपले असल्याने रविवारी (२३ जून) शाखेच्या आजीव सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा टिळक स्मारक मंदिर येथे होत आहे. या सभेमध्ये आगामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यानुसार सप्टेंबरअखेरीस नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. निवडणुकीची घोषणा होण्याआधीच बांधकाम व्यावसायिक सुधीर मांडके आणि शाखेच्या विद्यमान कार्यकारिणीमध्ये असलेले माजी महापौर शांतिलाल सुरतवाला हे स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
‘गेल्या वेळच्या निवडणुकीत आमच्या पॅनेलमधील माझ्यासह कीर्ती शिलेदार आणि समीर हंपी असे तिघे विजयी झाले. या निवडणुकीत आम्ही पॅनेल उभे करणार असून त्याविषयी दोन बैठका झाल्या असल्याचे’ शांतिलाल सुरतवाला यांनी सांगितले. निश्चित कार्यक्रम घेऊन आपले पॅनेल निवडणुकीला सामोरे जाणार असून पडद्यामागच्या कलाकारांनाही अडचणीच्या काळात आमची आठवण झाली पाहिजे, असे काम करून दाखविण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. सध्याचे अध्यक्ष केवळ ‘कार्यक्रमसम्राट’ आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुधीर मांडके म्हणाले, ‘माझी आई सुधाताई मांडके यांनी नाटय़ परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे नाटय़ परिषदेशी माझा संबंध आहे. रंगभूमी आणि रंगकर्मीच्या विकासासाठी २० महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा मानस असून त्यादृष्टीने मित्रमंडळींशी  संवाद झाला आहे’. आपले पॅनेल निवडून आले तर सुरूवातीला तीन वर्षांसाठी काम करण्याचा मनोदय आहे. त्यादृष्टीने सर्व कार्यकारिणीचा राजीनामा घेण्यात येईल. तीन वर्षांनी आजीव सभासदांना कार्याची माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसारच उर्वरित कार्यकाल पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader