पिंपरी : नावीन्यता, गुणवत्तेला आम्ही प्राधान्य देत आहोत. संरक्षण उद्योग (एमएसएमई) क्षेत्राबरोबर स्वदेशी शस्त्रात्रनिर्मितीसाठी करार केले जात आहेत. स्वदेशीकरणाने सक्षमीकरण शक्य होईल, असा विश्वास सैन्य दलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने मोशीत भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ची सोमवारी सांगता झाली. संरक्षण उद्योगाविषयी पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वायुदलप्रमुख व्ही. आर. चौधरी, नौदलप्रमुख आर. हरी कुमार यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तीन दिवसांत तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली.

सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले, की या प्रदर्शनात येणे आनंदाचा क्षण आहे. नावीन्यता, गुणवत्ता याला आम्ही प्राधान्य देत आहोत. संरक्षण उद्योग क्षेत्राबरोबर स्वदेशी शस्त्रात्र निर्मितीसाठी करार केले जात आहेत. नव्या तंत्रज्ञानाचे स्वागतच केले जाणार आहे. या सर्व तंत्राचे ‘पेटंट’ घेतले जातील. संरक्षण उद्योग क्षेत्राला परदेशातून येणाऱ्या मिलिटरी शिष्टमंडळाला भेटून प्रगतीची संधी दिली जात आहे. वापरकर्त्याच्या गरजा समजून घेतल्याने या क्षेत्राची प्रगती होणार आहे. ‘आर्मी डिझाईन ब्युरो’ आणि अन्य लष्करी संस्थादेखील योगदान देत आहे. या निमित्ताने ‘डिफेन्स इकोसिस्टिम’ तयार होत आहे. त्यामुळे आत्मनिर्भरतेला वाव मिळेल. स्वदेशीकरणाने सक्षमीकरण शक्य होणार आहे. उगवत्या भारताच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे.

हेही वाचा >>>जागतिक पातळीवर पुणे कसे महत्त्वाचे? पीयूष गोयल यांनी सांगितली कारणे…

नौदलप्रमुख आर. हरी कुमार म्हणाले, की भविष्यात काय होईल हे आपल्याला माहीत नसते. अनिश्चितता ही कायम असते. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात जबाबदाऱ्यांचा कस लागतो. त्यात सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. फक्त तंत्र महत्त्वाचे नसते, तर ते कसे वापरले जाते, हेही महत्त्वाचे असते. सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. स्वदेशी आणि सर्वंकष शस्त्रात्रे, तंत्र हे उद्दिष्ट आहे. धोरणात्मक स्वायतत्ता मिळविण्यासाठी कार्य केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट भारतात तयार होण्यासाठी काम केले पाहिजे. एक विकसित देश म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी योगदान दिले पाहिजे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contracts for indigenous armaments information from chief of army staff general manoj pandey pune print news ggy 03 amy