विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने महापालिकेवर आक्रोश झाडू मोर्चा काढण्यात आला. दोन वर्षांपासून बंद केलेला बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन फरकासह कामगारांना दिवाळी पूर्वी अदा करण्यात यावा तसेच भविष्य निर्वाहनिधी, ई.एस.आय., दरमहाचे वेतन १० तारखेच्या आत देण्यात यावेत, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
हेही वाचा >>>मानसिक आरोग्याबाबत संवाद वाढवण्याची गरज ; गैरसमज दूर करण्यासाठी लॅन्सेटतर्फे मार्गदर्शक सूचना
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी युनियनच्या शिष्टमंडळाला दिले. युनियनचे अध्यक्ष उदय भट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कार्याध्यक्ष चंद्रकांत गमरे, संयुक्त चिटणीस मधुकर नरसिंगे, कार्यालयीन चिटणीस वैजीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष दिलीप कांबळे, ओंकार काळे, शोभा बनसोडे, राम अडागळे, धनंजय आयवळे, रोहीणी जाधव, जयश्री भिसे, करुणा गजधनी, अरुण शेलार, रमेश पारसे, तानाजी रिकीबे या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पुण्यात पावसाचा हाहाकार ; नागरिकांत धडकी
महापालिकेच्या सात हजार कंत्राटी कामगारांना अपघात नुकसान भरपाई, दवाखान्यात विनामूल्य उपचार मिळाले पाहिजेत. सुधारित वेतन आयोगानुसार वेतन लागू करावे, ओळखपत्र वेतन चिठ्ठी, ईएसआय सुविधा तातडीने द्यावी. कामगार कायद्याप्रमाणे बोनस, घरभाडे भत्ता आणि रजावेतन शिवाय निविदेच्या अटी-शर्तीनुसार कामाचे साहित्य, गणवेश आणि अन्य सुविधा द्याव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली.