देशाच्या मंगळ मोहिमेला हातभार लावण्यात पुण्याचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. गेली चाळीस वर्षे इस्रोबरोबर काम करणाऱ्या ‘वालचंदनगर इंडस्ट्रीज’ने या मोहिमेसाठी लागणाऱ्या रॉकेटचे महत्त्वाचे सुटे भाग पुरवले आहेत.
रॉकेटच्या डोक्याच्या बाजूकडील (हेड एंड सेगमेंट) तसेच खालील बाजूकडील (नॉझल एंड सेगमेंट) सुटे भाग कंपनीने पुरवले आहेत. यात १३९ टन इंधन भरले जाऊ शकणारे धातूचे आवरण (केसिंग), सहा लहान मोटार केसेस, नॉझल अशा उपकरणांचा समावेश आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्ले म्हणाले, ‘‘जेव्हा एखाद्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाते तेव्हा यानाला पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्यासाठी एक प्रकारच्या रेटय़ाची (थ्रस्ट) आवश्यकता असते. यात शून्य आणि एक अशा दोन पायऱ्यांमध्ये यान अवकाशात प्रक्षेपित केले जाते. ‘बूस्टर मोटार केसिंग’ हे धातूचे आवरण असून त्यात इंधन भरलेले असते. या इंधनाच्या जोरावरच यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर ढकलले जाते. इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेले वायू नॉझलमधून बाहेर पडतात. ही घडलेली प्रतिक्रिया यानाला पुढे ढकलणारी असते.’’
१९७३ मध्ये इस्रोने आकाशात सोडलेल्या ‘एसएलव्ही- ३ रोहिणी’साठी कंपनीने प्रथम रॉकेटच्या मोटारीची केसिंग आणि नॉझल बनवली होती. एएसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही या सर्व प्रकारच्या लाँचिंग व्हेइकल्सना कंपनीने बनवलेली मोटार केसिंग वापरण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा