लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) आवारात एका विद्यार्थी संघटनेने बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ फलक लावल्याने तणाव निर्माण झाला. फलक लावण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मंगळवारी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अखेर फलक हटविण्यात आल्याने तणाव निवळला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.
आणखी वाचा-मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यात दाखल; समाजबांधवांना आवाहन करत म्हणाले…
अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) पार पडला. ‘एफटीआयआय’च्या आवारात मंगळवारी ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉनस्टिट्यूशन’ अशा आशयाचे फलक लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. फलक लावण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला. डेक्कन पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तणाव निर्माण केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.
आणखी वाचा-लोकसभेसाठी पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारांचे सर्वेक्षण सुरू; ‘या’ तारखेपर्यंत होणार उमेदवार निश्चित
नऱ्हे भागात तणाव
सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात एकाने घोषणाबाजी करून दोन तरुणांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तरुणांवर हल्ला करणारा मटण विक्रेता असून त्याला नागरिकांनी रोखले. त्यानंतर त्याने दुकानात कोंडून घेतले. या घटनेनंतर संतप्त जमावाने मटण विक्रेत्याला दुकानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.