लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मतदारांच्या हातामध्ये घड्याळाचे चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या आढळून आल्याने बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बारामतीत बाचाबाची आणि दमबाजीचा प्रकार घडला. त्यामुळे बारामती शहरातील वातावरण गंभीर झाले.

बारामती शहरातील बालक मंदिर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. या मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांच्या हातामध्ये घड्याळाचे चिन्ह असलेल्या चिट्ट्या आढळून आल्या. ही बाब राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी यावर आक्षेप घेतला. यावरून दोन्ही गटात बाचाबाची होऊन एकमेकांना दमबाजी करण्यात आली. ही बाब महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांना समजली असता त्या केंद्राच्या ठिकाणी आल्या.

आणखी वाचा-चिंचवडमधील थेरगावातील बुथवर पैसे वाटप? राहुल कलाटे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मला कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले की, आमच्यावर दबाव येत आहे. दमबाजी केली जात आहे. जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांकडे घड्याळ चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या मला या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. याबाबत आम्ही संबंधितांकडे लेखी तक्रार करणार आहोत. तसेच धमकी देण्याबाबतही तक्रार करणार आहोत. धमकी देणारे येथील स्थानिक पदाधिकारी, नेते आहेत. त्यांची नावे लवकरच समोर येतील.

आणखी वाचा-कसब्या पाठोपाठ खडकवासल्यात सर्वाधिक मतदान, दुपार पर्यंत २९ टक्के मतदानाची नोंद

हा आरोप खोटा आहे. तसे झालेले असेल तर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ते रेकॉर्ड झालेले असेल. निवडणूक आयोग बघेल. आज आम्ही एवढ्या निवडणुका पार पाडल्या. मात्र कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने कधीही वक्तव्य केलेली नाहीत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये राहत असून, सुसंस्कृतपणा दाखवतो. शाहू फुले आंबेडकरांची आमची विचारधारा आहे. त्यामुळे माझा कार्यकर्ता असे करणार नाही. असा माझा माझ्या कार्यकर्त्यावर ठाम विश्वास आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.