पुणे : कोथरूड येथील थोरात उद्यानातील प्रस्तावित मोनोरेल प्रकल्पावरून शहर भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी नागरिकांना पाठिंबा दर्शवित या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे, तर माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ या प्रकल्पासाठी आग्रही आहेत.
कोथरूड येथील थोरात उद्यानात खुली व्यायामशाळा, योग केंद्र, विरंगुळा केंद्र, वाॅकिंग ट्रॅक, डायनासोर पार्क यासाठी बांधकाम केल्यानंतर आता प्रस्तावित मोनो रेल प्रकल्पासाठी उद्यानात मोठ्या प्रमाणावर खांब उभारण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी उद्यानात बांधकाम करण्यात येणार असल्याने मोनो रेलला उद्यानप्रेमींकडून विरोध सुरू झाला आहे.
उद्यानामध्ये ७२ व्होल्ट डिसी बॅटरी ऑपरेटेड मोनोरेल उभारण्यात येणार आहे. दोन डब्यांची ही मोनोरेल असून त्यासाठी ४१० आरएमटी ट्रॅक, सुरक्षा रेलिंग, प्लॅटफाॅर्म तिकीट कक्षासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम कोलकाता येथील ब्रॅथवेट कंपनीला देण्यात आले असून पुढील महिन्याभरात मोनोरेलेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र दहा फूट उंचीवरून जाणाऱ्या मोनो रेलसाठी सुमारे सत्तर खांबांची उभारणी उद्यानात करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानात चालायचे कसे? असा प्रश्न उद्यानप्रेमींकडून उपस्थित करण्यास सुरुवात झाली असून या प्रकल्पाविरोधात स्थानिक एकवटले आहेत. या प्रकल्पाविरोधात नागरिकांनी कृती समिती स्थापन केली असून प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी कृती समितीने लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. त्याला उपस्थित रहात कुलकर्णी यांनी नागरिकांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला आहे.
हेही वाचा >>>पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही! खासदार सुप्रिया सुळे यांचा दावा
माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ या प्रकल्पासाठी आग्रही आहेत. नगरसेवक असताना त्यांनी हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. मात्र कृती समितीने यासंदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
नागरिकांची मागणी नसताना प्रकल्प लादणे अयोग्य आहे. कृती समितीने व्यक्त केलेली चिंता योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे, अशी भूमिका कुलकर्णी यांनी घेतली आहे.
वेताळ टेकडी फोडून प्रस्तावित करण्यात आलेल्या बालभारती पौड रस्त्यालाही कुलकर्णी यांनी विरोध दर्शविला होता. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील या प्रकल्पासाठी आग्रही होते. मात्र पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्रकल्पांना विरोधच असेल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले होते. आता कोथरूड मधील मोनोरेल प्रकल्पासंदर्भाही त्यांनी नागरिकांच्या बाजूने भूमिका घेतली आहे.
कृती समितीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात भेट घेतली. नागरिकांची कोणतीही मागणी नसताना हा प्रकल्प लादणे योग्य नाही. त्यामुळे नागरिकांच्या बाजूची भूमिका आहे.- मेधा कुलकर्णी, खासदार