पिंपरी- चिंचवडमध्ये अज्ञात सात ते आठ जणांनी गुन्हेगाराची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री दहाच्या सुमारास रावेत परिसरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. अमोल गोरगले असे हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. अमोलसोबत असलेला सहकारीदेखील यात जखमी झाला आहे.

या प्रकरणी शेखर अशोक ओव्हाळ, मुन्ना उर्फ अभिषेक ओव्हाळ, समीर शेख, महेश कदम, गणेश कदम आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या वादाचा राग मनात ठेवून अमोलची हत्या करण्यात आली आहे.

हेही वाचा – मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; सरकत्या जिन्यावरून उतरताना घटना; पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार

हेही वाचा – अजित पवारांच्या बालेकिल्यावर भाजपचे लक्ष; अमित गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दहाच्या सुमारास बेसावध असलेल्या अमोल गोरगले याच्यावर सात ते आठ जणांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. अमोल याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्येत भाजपचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यांना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अमोल गोरगले आणि ओव्हाळ यांचे वाद झाले होते. यारून ही हत्या झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शेखर ओव्हाळ हे आधी राष्ट्रवादीत होते. चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमोल गोरगले याच्यावर देखील गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. रावेत पोलीस हे इतर आरोपींचा शोध घेत आहेत.