पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने गणेश अथर्वशीर्षांवर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यावरून वादाला तोंड फुटले असून, या अभ्यासक्रमावर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संस्कृत प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी संस्कृत विभाग यांच्यातर्फे ‘व्यक्तिमत्त्व विकासाचा आलेख – मन:शांतीचा राजमार्ग श्री गणेश अथर्वशीर्ष’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठातील संस्कृत-प्राकृत विभागाअंतर्गत हा अभ्यासक्रम आहे. ऑनलाइन राबवला जाणारा अभ्यासक्रम कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला करता येईल. अभ्यासक्रमात समाविष्ट २१ दृक् -श्राव्य ध्वनिचित्रफितींवर प्रश्नावली सोडवावी लागेल. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक श्रेयांक दिला जाणार आहे.
अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारताची परंपरा सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. हा अभ्यासक्रम एकाच विद्यापीठापुरता मर्यादित न ठेवता सर्वच विद्यापीठांत असायला हवा. मंत्राचे महत्त्व, शारीरिक आणि मानसिक लाभ लोकांपर्यंत पोहोचले, तर सर्व जण याचा मनस्वी आनंद घेतील. शिक्षणाला अध्यात्म, ज्ञान व विज्ञानाची जोड देत योग्य सांगड घालणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी मांडली. ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत प्रा. हरि नरके यांनी मात्र त्यास विरोध केला आहे. ‘‘पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्ने सनातनी मंडळी रंगवत आहे आणि त्यासाठी विद्यापीठे वेठीला धरली जात आहेत. हे धोकादायक पाऊल आहे,’’ अशी भूमिका प्रा. नरके यांनी मांडली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, की संस्कृत साहित्याचा भाग म्हणून अथर्वशीर्ष अथवा कोणतेही धार्मिक साहित्य अभ्यासण्याविषयी आक्षेप असण्याचे कारण नाही. पण तो अभ्यास डोळसपणे करायला हवा. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जरी अथर्वशीर्ष हे संस्कृत विषयात आहे असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात त्या मोडय़ुलचे नाव ‘व्यक्तिमत्त्व विकासाचा आलेख आणि मन:शांतीचा राजमार्ग’ असे दिले आहे. व्यक्तिगत पातळीवर ही श्रद्धा असू शकते, पण विद्यापीठासारख्या राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षत्वाला बांधील संस्थेने असा सरसकट दावा करणाऱ्या अभ्यासक्रमाला, मग तो कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेचा असला तरी त्याचा संशोधनआधार तपासून पाहणे आवश्यक आहे. गणपतीला बुद्धिदाता म्हटले जाते आणि विद्यापीठ सत्यशोधक सावित्रीबाई फुले यांच्या नावाचे आहे. त्या पार्श्वभूमीवर ही अपेक्षा करणे चुकीचे होणार नाही, असे वाटते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू करणे हा उलटय़ा पावलांचा प्रवास आहे. पेशवाईची स्वप्ने सनातनी मंडळी रंगवत आहेत आणि त्यासाठी विद्यापीठे वेठीला धरली जात आहेत. उद्या आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक्रम बंद केले जातील.
– प्रा. हरि नरके, सत्यशोधक विचारवंत
मंत्रांचे महत्त्व, शारीरिक आणि मानसिक लाभ लोकांपर्यंत पोहोचले, तर सर्व जण याचा मनस्वी आनंद घेतील. शिक्षणाला अध्यात्म, ज्ञान व विज्ञानाची जोड देत योग्य सांगड घालणे महत्त्वाचे आहे.
– डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
गणेश अथर्वशीर्ष ही प्रार्थना आहे. प्रार्थना ही कुठल्या धर्मापुरती नसते. हा अभ्यासक्रम सक्तीचा नाही. ज्यांना इच्छा आहे, ते अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील, ज्यांना इच्छा नाही, ते घेणार नाहीत. – चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री