पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत आहेत, असे नमूद करीत त्यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या काँग्रेसच्या संलग्न संघटना तसेच आम आदमी पक्ष (आप) आणि युवक क्रांती दलाने (युक्रांद) विरोध केला आहे. त्यामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळक पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा केल्यानंतर शहरातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे शहराध्यक्ष अरिवद शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. यासंदर्भात पुढील धोरण आखण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल, असे इंटकचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले. सेवा दलाचाही या निर्णयाला विरोध असल्याचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी स्पष्ट केले.

युवक क्रांती दल आणि आम आदमी पक्षानेही या पुरस्काराला विरोध दर्शविला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट स्वतंत्र असला तरी वैचारिक भूमिका काँग्रेसची आहे. काही वैयक्तिक लाभ मिळविण्याच्या हेतूने पंतप्रधानांना पुरस्कार जाहीर केला असावा, असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केला. मोदी यांची विचारधारा हुकूमशाहीसारखी आहे. पुरस्कार देणे हा लोकमान्य टिळकांच्या कार्याचा अपमान आहे, अशी टीका युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over lokmanya tilak award pune amy
Show comments