पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलाची उंची कमी असल्याने या पुलामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बाबत गणेश मंडळांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना निवेदन दिले. मेट्रोच्या पादचारी पुलाच्या उंचीवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात अन्य ठिकाणी रस्ता ते मेट्रो मार्गिकेचा मार्गाची उंची २१ फूट ठेवण्यात आली आहे. मात्र, जंगली महाराज रस्त्यावरील पादचारी पुलाची रस्त्यापासून उंची १७ फूट ठेवण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना भागात विसर्जन झाल्यानंतर अनेक मंडळे जंगली महाराज रस्त्याने मार्गस्थ होतात. विसर्जन आटोपून जाणाऱ्या मंडळांच्या देखाव्यांची उंची विचारात घेतल्यास जंगली महाराज रस्त्यावरील पूल अडचणीचा ठरणार आहे. मंगळवारी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. पादचारी पुलाची उंची १७ फूट ठेवण्यात आल्याने विसर्जन मिरवणुकीतील देखावे आणि रथ तेथून मार्गस्थ होताना अडचण होण्याची शक्यता आहे, असे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा… पुणे: मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे काँग्रेस भवनात आंदोलन, नाना पटोले यांना आंदोलनकर्त्यांचा घेराव

हे ही वाचा… पुण्याच्या खासदारांनी टोचले कान, म्हणाल्या, ‘आवाज कमी करा… ‘

विसर्जन मिरवणुकीतील देखावे, रथांची उंची पूर्वी २५ ते ३० फूट असायची, खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलाची उंची कमी असल्याने मंडळांनी देखाव्यांची उंची कमी केली. छत्रपती संभाजी पुलावरुन मेट्रो मार्गिकेच्या पुलाची उंची २१ फूट ठेवल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून आंदोलन केले होते. मात्र, छत्रपती संभाजी पुलावरुन जाणाऱ्या मेट्रो पुलाची उंची जास्त ठेवता येत नसल्याचे मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी देखाव्यांची उंची कमी केली. विसर्जन मिरवणूक आटोपून जंगली महाराज रस्त्याने मंडळे मार्गस्थ होतात. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या पुलाची उंची १७ फूट ठेवल्याने मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over metro foot over bridge on jangali maharaj road pune print news rbk 25 asj