पुणे : शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून नवा वाद उभा राहिला आहे. प्रभारी म्हणून काम करणारे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ब्लाॅक अध्यक्षांच्या नियुक्त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. पूर्णवेळ अध्यक्षांना ब्लाॅक अध्यक्ष नियुक्तीचे अधिकार आहेत, प्रभारी अध्यक्षांना नाहीत, असा आरोप काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मात्र, मीच पूर्णवेळ अध्यक्ष असून, येत्या काही दिवसांत अधिकृत पत्र मिळेल, असा दावा प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रभारी की पूर्णवेळ, असा नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
पाच वर्षाहून अधिक कालावधीसाठी पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पदे रिक्त करावीत, असा ठराव काँग्रेसच्या बैठकीत गेल्या वर्षी जून महिन्यात करण्यात आला होता. त्यानुसार माजी अध्यक्ष रमेश बागवे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या शिर्डी येथील चिंतन शिबिरात एक व्यक्ती एक पद अशा ठरावानुसार बागवे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान, कॉग्रेसची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया होणार असल्याने काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण
या दरम्यान, अधिवेशनातील ठरावानुसार पाच वर्षांपासून जास्त काळ पदावर असलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ब्लाॅक अध्यक्षांची नियुक्ती काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मात्र प्रभारी शहराध्यक्षांना नियुक्तीचे अधिकारी नाहीत, असा आरोप काँग्रेसच्या एका गटाकडून करण्यात आला आहे.शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून दोन गट पडल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पक्षातील अंतर्गत वाद विविध बैठकांतूनही पुढे आले आहेत. बैठका, आंदोलनांकडे दोन्ही गटांचे पदाधिकारी, कार्यकर्ते पाठ फिरवीत आहेत. त्यातच आता ब्लाॅक अध्यक्षांच्या नियुक्त्यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>सावधान! पक्षी, प्राण्यांपासून बर्ड फ्लू संसर्गाचा मानवाला धोका
रमेश सकट (येरवडा), रमेश सोनकांबळे (मार्केटयार्ड), सुजित यादव (भवानी पेठ), आसिफ शेख (पुणे कॅन्टोन्मेंट), अजित जाधव (शिवाजीनगर), संतोष पाटोळे (पर्वती), बळीराम डोळे (हडपसर),विशाल जाधव (बोपोडी), हेमंत राजभोज (पं. नेहरू स्टेडियम), रवींद्र माझिरे (कोथरूड), अक्षय माने (कसबा पेठ) यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. ब्लॉकमध्ये नवीन मतदारनोंदणी, दुरुस्ती अभियान आणि पक्षाच्या बैठकांचे आयोजन करण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.
काँग्रेसची संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शहराला पूर्णवेळ अध्यक्ष नाही.-रमेश बागवे, माजी अध्यक्ष
काँग्रेसचे शहराध्यक्षपद माझ्याकडे आहे. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार कामकाज सुरू आहे. त्याबाबतचे अधिकृत पत्र लवकरच मिळेल.-अरविंद शिंदे, प्रभारी अध्यक्ष