पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी गेल्या महिन्यात मर्सिडिज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाची पाहणी केली की तपासणी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या महिन्यात यावरून गदारोळ झाल्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही प्रकल्प पाहण्यासाठी सहज भेट होती, अशी भूमिका घेतली होती. आता मंडळाने कंपनीला पाठविलेल्या नोटिशीत कदम यांच्या भेटीच्या दिवशीच तपासणी झाल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यांमधील विसंगती समोर आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपन्यांची तपासणी केली जाते. त्या पर्यावरण नियमांचे पालन करीत आहेत का, याची तपासणी मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी करतात. मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम २३ ऑगस्टला पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी अचानक मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला भेट दिली. मर्सिडीजच्या भेटीबाबत आणि कंपनीकडून होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल समाजमाध्यमावर पोस्ट करण्यात आली. मात्र, नंतर ती काढून टाकण्यात आल्याने या भेटीचे नेमके प्रयोजन काय होते, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

हेही वाचा >>>पुणे : नवरात्रोत्सवापूर्वी चतु:शृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास,मंदिर रविवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुले

या भेटीवरून गदारोळ झाल्यानंतर मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी कदम यांची ही भेट सहज असल्याचा दावा केला होता. मर्सिडीजच्या प्रकल्पाची तपासणी केली नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. आता मंडळाने १९ सप्टेंबरला मर्सिडीजला नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार, मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २३ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबरला प्रकल्पाची पाहणी केली. कदम यांनी २३ ऑगस्टला केवळ भेट दिली होती, तर नोटिशीत त्या वेळी तपासणी झाल्याचा उल्लेख कसा, यावर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे. यामुळे मंडळाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

२३ ऑगस्टला नेमके काय झाले?

आधीचे म्हणणे

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम पुण्यात आले होते आणि त्यांना मर्सिडीजचा प्रकल्प पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे त्यांनी प्रकल्पाला सहज भेट दिली. प्रकल्पाची कोणतीही तपासणी त्या वेळी करण्यात आली नाही, असा दावा मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी आधी केला होता.

हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवड: भोसरी मतदारसंघ तुतारीला? शिवसेना ठाकरे गटाने घेतला हा मोठा निर्णय

आताचे म्हणणे

प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी आता बजाविलेल्या नोटिशीत २३ ऑगस्टला तपासणी झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी आधी केलेला दावा स्वत:च खोडून काढला आहे. कदम यांच्यासह मंडळाचे अधिकारी २३ ऑगस्टला कंपनीत गेले होते आणि त्या वेळीच ही तपासणी

मंडळाच्या नोटिशीत नेमके काय?

मर्सिडीज बेंझने मंडळाच्या प्रदूषणविषयक नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे कंपनीकडून प्रदूषित पाणी आणि प्रदूषित हवा पर्यावरणात सोडली जात आहे. त्यातून जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण होत आहे. त्यामुळे कंपनीवर कायदेशीर कारवाई का करू नये, याचे उत्तर १५ दिवसांत द्यावे. अन्यथा, कंपनीवर जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा १९७४ आणि वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा १९८१ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.