पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मेट्रो अधिकारी, पोलिसांशी अरेरावी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षांपूर्वी मनोरमा यांनी मेट्रो अधिकारी आणि पोलिसांशी बाणेर येथील बंगल्यासमोर वाद घातला होता. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्याने त्या आणखी अडचणीत आल्या आहेत.
मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकर, त्यांचे पती दिलीप यांच्यासह सातजणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात पुणे पोलिसांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुणे पोलिसांकडून मागविला आहे. आता मनोरमा खेडकर यांनी मेट्रो रेल्वेचे अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
हेही वाचा…मुद्रांक अभय योजनेतून ३९३ कोटींचा महसूल, ५६ हजार प्रकरणे निकाली
मनोरमा खेडकर यांनी २०२२ मध्ये बाणेर परिसरात मेट्रो अधिकारी आणि पोलिसांशी अरेरावी केल्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे. खेडकर यांचा बाणेरमधील नॅशनल सोसायटीत ओमदीप नावाचा बंगला आहे. बंगल्यासमोर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होते. मेट्रोने पदपथावर साहित्य ठेवले होते. या कारणावरून खेडकर यांनी मेट्रोच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकारी चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले. तेव्हा खेडकर यांनी मेट्रोचे अधिकारी आणि पोलिसांशी वाद घालून अरेरावी केली. त्यावेळी या घटनेचे चित्रीकरण एका पोलीस कर्मचाऱ्याने केले होते. मेट्रो अधिकारी, पोलिसांशी अरेरावी करतानाचे चित्रीकरण संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ठेवले होते, अशी माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली. याप्रकरणात खेडकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.