राहुल खळदकर, लोकसत्ता

पुणे : न्यायालयात सर्व पातळय़ांवर टिकेल अशा सबळ पुराव्यांअभावी गंभीर गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा न मिळाल्याचे प्रकार अनेकदा घडतात. ही त्रुटी दूर करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पोलिसांनी सातत्याने प्रयत्न केल़े  गंभीर गुन्ह्यांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ, सखोल तपासासाठी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण आणि योग्य समन्वयामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढले आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अवघे ८.२ टक्के होते. आता त्यात तब्बल सात पटींनी वाढ होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण ५५.३६ टक्के झाले आहे.

राज्यात २०११ मध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण (दोषसिद्धी) ८.२ टक्के होते. शासन, गृहखाते तसेच पोलिसांच्या उपाययोजनांमुळे गेल्या दहा वर्षांत गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण सात पटीने वाढले आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बऱ्याचदा सबळ पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. न्यायालयात आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यापूर्वी तपासाची कागदपत्रे योग्यरीत्या सादर न करणे, कागदपत्रांसह अन्य बाबींची पूर्तता वेळेत न करणे याबाबत मध्यवर्ती सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमार्फत दोषारोपपत्र सादर करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीकडून ऑनलाइन पद्धतीने तपासातील प्रत्येक टप्प्यावरचे प्रशिक्षण देण्यात आले. तपासी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण तसेच न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

नंदुरबारमध्ये प्रमाण सर्वाधिक

राज्यातील वेगवेगळय़ा शहरांतील पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यांचा तपास करून न्यायालयात पुरावे तसेच कागदपत्रे सादर केली जातात. नंदुरबार पोलिसांनी २०२१ मध्ये योग्य तपास करून आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले. नंदुरबारमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण ९२.१३ टक्के एवढे आहे. त्याखालोखाल मीरा भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ८९.६३ टक्के आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस दलात हे प्रमाण ८६.६७ टक्के, रायगड ७९.७० टक्के, रत्नागिरी ७८.८९ टक्के, सिंधुदुर्ग ७८.५७ टक्के आहे.

प्रमाण आणखी वाढविण्याचे प्रयत्न

गंभीर गु्न्ह्याचा खटला सुरू झाल्यानंतर बऱ्याचदा साक्षीदार फितूर होतात. साक्षीदारांना आरोपींच्या साथीदारांकडून धमकावले जाते. असे प्रकार टाळण्यासाठी साक्षीदारांना विश्वासात घेणे गरजेचे असते. वेळप्रसंगी त्यांना पोलीस संरक्षण द्यावे लागते. देशात केरळमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ५५ टक्के आहे. हे प्रमाण आणखी वीस टक्क्यांनी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) अधिकाऱ्यांनी दिली. आरोपींना शिक्षा होण्यासाठी तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर देण्यात आलेले प्रशिक्षण, सबळ पुरावे, न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यासाठी देण्यात आलेले प्रशिक्षण महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader