पिंपरी महापालिकेने आजी-माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य तसेच स्वीकृत सदस्य असे मिळून १५० जणांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यास संबंधितांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पुढे आले आहे. याबाबतची माहिती संकलित होत नसल्याने वैतागलेल्या प्रशासनाने सर्वच पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवले असून आवश्यक माहिती तातडीने पाठवण्याची विनंती केली आहे.
पिंपरी पालिकेने १९ ऑगस्ट २०१४ च्या सभेत सदस्य व त्यांचे कुटुंबीय यांच्याकरिता १० लाख रकमेचा आरोग्य विमा उतरवण्याचा ठराव मंजूर केला. तथापि, तीन एप्रिल २०१५ ला आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत १० लाखांऐवजी पाच लाख रुपये विमा उतरवण्याचा निर्णय झाला. १५० सदस्यांकरिता १५ लाखांचा हप्ता अपेक्षित धरण्यात आला असून त्यातील १० टक्के रक्कम संबंधित सदस्याने तर उर्वरित ९० टक्के रक्कम महापालिका भरणार आहे. माजी नगरसेवकांसाठी हप्त्याचा २५ टक्के हिस्सा संबंधित सदस्यामार्फत व ७५ टक्के हिस्सा पालिकेकडून दिला जाणार आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयाचे स्वागत झाले. प्रत्यक्षात मात्र, संबंधितांकडून थंडा प्रतिसाद आहे. महापालिकेने एकीकडे विमा कंपन्यांशी चर्चा सुरू केली असताना सदस्यांकडून मात्र याबाबतची माहितीच पुरवण्यात आलेली नाही. माहितीच संकलित नसल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आरोग्य वैद्यकीय विभागाने आता प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये आपल्या पक्षाशी संबंधित आजी-माजी नगरसेवकांना त्यांची कुटुंबातील माहिती तातडीने पाठवण्याची सूचना करावी, अशी विनंती केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा