रोजगारासाठी राज्याच्या विविध भागातून पुण्यात येणाऱ्या हमालांना सकस आहार अगदी स्वस्तात मिळावा यासाठी गांधी जयंतीचे निमित्त साधून हमाल पंचायतीने सुरू केलेल्या कष्टाची भाकरी या योजनेला गुरुवारी चाळीस वर्षे पूर्ण झाली. दररोज १० ते १२ हजार कष्टकऱ्यांची भूक भागविणारी व ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्वस्त, सकस, ताजा आहार हे ब्रीद घेऊन चाललेल्या या योजनेची आज १२ विक्री केंद्रे झाली आहेत. ही केवळ संस्थाच नव्हे, तर एक चळवळही ठरली.
गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर १९७४ ला बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतीच्या वतीने कष्टाची भाकरी योजना सुरू करण्यात आली. राज्याच्या विविध भागातून कष्टकरी मंडळी पुण्यात येत असताना त्यांची जेवणाच्या दृष्टीने होणारी तारांबळ या योजनेच्या माध्यमातून दूर होऊ शकली. भवानी पेठेमध्ये एका केंद्राच्या माध्यमातून सुरू झालेली ही योजना आज विस्तारली आहे.
सध्या अगदी २० ते ३० रुपयांमध्ये या केंद्रांच्या माध्यमातून पोटभर जेवण मिळू शकते. भाकरी-भाजी किंवा चपाती-भाजी २० रुपयात मिळू शकते. भजीसह भाकरी व भाजी ३० रुपयांत मिळते. काहीसा गोडवा हवा असल्यास लाडू, जिलेबी आदी गोष्टीही या केंद्रात मिळतात. आहारातील सकसता लक्षात घेता रोज वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो. कडधान्य प्रामुख्याने वापरली जातात. कष्टाच्या या भाकरीला घरच्या खाण्याची चव असते, कारण कष्टकरी घरातील महिलाच केंद्रामध्ये जेवण तयार करतात. ‘कष्टाची भाकरी’ केवळ उदरभरणच नव्हे, तर अनेक चळवळींचे आधारकेंद्रही ठरली आहे. आजही परिवर्तनवादी चळवळींच्या कार्यक्रमाला हमाल पंचायतीच्या या योजनेतूनच जेवण पुरविले जाते.
योजनेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त कष्टाची भाकर मुख्यालयात गुरुवारी कार्यक्रम घेण्यात आला. बाबा आढाव, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, एसएनडीटी विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभागाच्या उपसंचालक पौर्णिमा चिकरमाने तसेच हरिदाश शिंदे, नवनाथ बिनवडे, गोरख मेंगडे, चंद्रकांत मानकर त्या वेळी उपस्थित होते. आढाव या वेळी म्हणाले, क्रांती म्हणजे अन्याय, अत्याचार या विरुद्ध झालेला केवळ विस्फोट नव्हे, तर नवनिर्मिती ही सुद्धा विधायक क्रांतीच होय. दुसऱ्या जीवाबद्दल मानवाला वाटत असलेली कणव ही अशा क्रांतीची बीजे असतात. या गांधी विचारातूनच गेली ४० वर्षे अव्याहतपणे कष्टाची भाकर केंद्र हजारो दिन, दलित, कष्टकरी, विद्यार्थी, प्रवासी अशा समाजाच्या शेवटच्या पायरीवरील माणसाची क्षुधाशांती करत आहे.
ज्वारी महाग झाल्याने अडचण
कष्टाची भाकर ही योजना सुरू झाली तेव्हा ज्वारीची किंमत गव्हापेक्षा कमी होती. आजची स्थिती पाहिली तर गहू स्वस्त, तर ज्वारी महाग झाली आहे. अशी परिस्थिती कधीच पाहिली नसल्याचे हमाल मंडळीही सांगतात. ज्वारी स्वस्त असताना स्वस्तात भाकरी देणे शक्य होत होते. मात्र आता ज्वारी ३० ते ३२ रुपये किलो झाली आहे. त्यामुळे अडचण निर्माण झाली असली तरी त्यावर मात करीत ‘कष्टाची भाकरी’ सुरूच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा