सहकार कायद्यातील ९७ वी घटनादुरुस्ती कामगार विरोधी असल्याचा आरोप करीत त्यास विरोध म्हणून बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मंगळवारी बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुतांश सहकारी बँका या दिवशी बंद राहणार आहेत. संघटनेच्या वतीने बंद पाळून विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
संघटनेचे सरचिटणीस सुरेश जगताप यांनी याबाबतची माहिती दिली. सहकारी कायद्यातील घटनादुरुस्ती कामगार विरोधी व सहकार क्षेत्राला मारक असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या दुरुस्तीला विरोध करण्याबरोबरच सहकारी बँका, संस्थांच्या व्यवस्थापनात पूर्वीप्रमाणे कामगाराला प्रतिनिधित्व मिळावे, तसेच राज्य कृषी व ग्रामीण विकास बँकांचे पुनर्जीवन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन व बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.