पुणे : भारतीय रिझव्र्ह बँकेच्या (आरबीआय) आदेशानुसार रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द होऊन ती अवसायनात काढण्यात आली आहे. त्यानुसार सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी धनंजय डोईफोडे यांची बँकेचे अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे. परिणामी, बँकेचे प्रशासकीय मंडळ बरखास्त झाले आहे.
रुपी बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्याचे आदेश रिझव्र्ह बँकेने ८ ऑगस्ट रोजी दिले होते. या आदेशाविरोधात बँकेने अर्थमंत्रालयाकडे दाद मागितली होती. मात्र, त्यावर सुनावणी होऊन केंद्रीय अर्थमंत्रालयाने बँकेची मागणी सोमवारी फेटाळली. त्यामुळे बँक अवसायनात काढण्यात आली असून, डोईफोडे यांची अवसायक म्हणून सहकार आयुक्त कवडे यांनी नियुक्ती केली आहे. याबाबत बोलताना सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले, ‘‘बँकेवर अवसायक नियुक्त करण्यात आला आहे. पुढील सहा वर्षे बँकेवर अवसायक कार्यरत राहतील. आतापर्यंतच्या चौकशीत दोषी ठरलेल्यांकडून वसुली करण्याचे सर्वाधिकार अवसायकांना आहेत. नियमानुसार या वसुलीतून प्राधान्याने पाच लाखांच्या आत रक्कम असणाऱ्या ठेवीदारांचे पैसे परत केले जातील. त्यानंतर ठेव विमा महामंडळाचे पैसे दिले जातील आणि त्यानंतर पाच लाखांपुढील ठेवी असणाऱ्या खातेदारांचे पैसे परत करण्याची कार्यवाही केली जाईल.’’