पुणे :  व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने  सहकार खात्यातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी चौघांना अटक केली असून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शंकर शिंदे (वय ५२, रा. बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव नाहे. शिंदे सहकार खात्यात अधिकारी आहेत. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात विजय सोनी यांचे वडील, पंधरकर, शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांची पत्नी शोभना (वय ४७) यांनी या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सोनी, क्षीरसागर, साळुंखे, हाजरा, पंधरकर गणेश शिंदे यांच्या ओळखीचे आहेत. आरोपींकडून शिंदे यांनी आर्थिक विवंचनेतून ८४ लाख ५० हजार रुपये कर्ज व्याजाने घेतले होते. आरोपींनी व्याजाच्या पैशांवरून शिंदे यांना त्रास देण्यास सुरुवात केली.

आरोपी पंधरकर याने शिंदे यांना एक कोटी रुपयांचे कर्ज मंजुरीचे आमिष दाखविले होते. कर्ज मंजुरीसाठी शिंदे यांनी पंधरकर याला पैसे दिले होते. ऐनवेळेस पंधरकरने कर्ज मंजुरीस नकार दिल्याने पतीला धक्का बसला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे शिंदे यांची पत्नी शोभना यांनी फिर्यादीत म्हटले आहे.  शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग तपास करत आहेत.

Story img Loader