पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या बैठकीचा समारोप शनिवारी होणार आहे. तीन दिवसांच्या बैठकीतील पहिले दोन दिवस विविध सामाजिक, राजकीय विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली असून, या चर्चेला येत्या काही दिवसांत अधिकृत निर्णय घेऊन मूर्त स्वरूप दिले जाणार आहे. दरम्यान, बैठकीच्या दुसऱ्या दिवशी विविध विषयांवरील प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून प्रदर्शनाची माहिती घेण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू आहे. देशातील सध्याची राष्ट्रीय, सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत आहे. सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत, सरकार्यवाहक दत्तात्रेय होसबाळे यांच्यास अन्य पाच सह सरकार्यवाह यांच्यासह ३६ संघटनांचे प्रमुख २६७ पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले असून, त्यामध्ये ३० महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राम मंदिर, समान नागरी कायदा, आरक्षण आदी ज्वलंत विषयांबरोबरच देशातील राजकीय परिस्थिती, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवरही या बैठकीत ऊहापोह करण्यात आला असून, संघटनेच्या विस्तारासंदर्भातही चर्चा सुरू आहे.
या बैठकीचा समारोप शनिवारी (१६ सप्टेंबर) होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भुज येथे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या बैठकीतील चर्चेवर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, बैठकीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पहिल्या दिवशी उपस्थित होते. शुक्रवारी ते छत्तीसगड येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यानंतर ते शुक्रवारी सायंकाळी बैठकीला पुन्हा उपस्थित राहिले. देशातील राज्यातील भाजपच्या ताकतीचे चित्र ते बैठकीत मांडणार आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष असून, त्या निमित्ताने शिवचरित्राची ओळख एका प्रदर्शनाद्वारे करून देण्यात आली. छत्रपती शिवाजीमहाराज आणि जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्या भेटीचा इतिहास जागविणारे ‘भक्ती-शक्ती संगम’ हे शिल्पही या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्यसंग्रामातील जनजाती नायकांचे योगदान’ या ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेचे प्रदर्शनही आहे. विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रारंभ केलेले ‘स्वावलंबी भारत अभियान’ प्रदर्शन भरविण्यात आल्याची माहिती संघ पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.