लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांतील गैरप्रकारांची संख्या घटली आहे. यंदा राज्यभरात दहावीच्या परीक्षेत ८९, तर बारावीच्या परीक्षेत ३६० गैरप्रकारांची नोंद झाली.

राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली. या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांच्या परिसरात जिल्हा प्रशासनाकडून ड्रोनद्वारे परीक्षा केंद्रांची निगराणी, परीक्षा केंद्रांबाहेर दृक् श्राव्य चित्रीकरण, सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके, बैठ्या पथकांची नियुक्ती, परीक्षा केंद्रावर नियुक्त केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची ‘चेहरा पडताळणी व्यवस्थे’द्वारे (फेस रेगक्निशन) तपासणी, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, अशा विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, गैरप्रकार घडणाऱ्या शाळा, महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीची परीक्षा आणि यंदाच्या परीक्षेतील गैरप्रकारांच्या आकडेवारीची तुलना करता यंदा गैरप्रकारांची संख्या कमी झाल्याचे दिसते. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत २९९, तर यंदा ८९ गैरप्रकार नोंदवले गेले आहेत. गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेत ४५२, तर यंदा ३६० प्रकरणांची नोंद झाली आहे. दहावीच्या परीक्षेत २१०, तर बारावीच्या परीक्षेत ९२ गैरप्रकार कमी झाल्याचे दिसून येते.

छत्रपती संभाजीनगर विभागात गैरप्रकार सर्वाधिक

दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक गैरप्रकार नोंदवले गेले. दहावीच्या परीक्षेत ३७, तर बारावीच्या परीक्षेत २१४ प्रकरणे उघडकीस आल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली. दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात १५, नागपूर विभागात २१, मुंबई विभागात ३, लातूर विभागात १३ प्रकरणांची नोंद झाली. कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण चार विभागांत एकही गैरप्रकार नोंदवला गेला नाही. बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात ४२, नागपूर विभागात ३२, मुंबई विभागात ९, कोल्हापूर विभागात ७, अमरावती विभागात १०, नाशिक विभागात १२, लातूर विभागात ३३, तर कोकण विभागात एका प्रकरणाची नोंद झाली आहे.