पुणे: पुणे जिल्ह्यासह धाराशिव, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोथिंबीर विक्रीस पाठविली असून, दिवाळीत कोथिंबीर स्वस्त झाली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर २५ ते ३० रुपयांपर्यंत होते. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे जिल्ह्यातून कोथिंबिरीची आवक होते. लातूर, धाराशिव जिल्ह्यात कोथिंबिरीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. तेथील शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात कोथिंबीर मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविली आहे. त्यामुळे बाजारात कोथिंबिरीच्या दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या शेकडा जुडींना ६०० ते १२०० रुपये असे दर मिळाले आहेत. घाऊक बाजारात एका जुडीला प्रतवारीनुसार पाच ते दहा रुपये असे दर मिळाले असल्याची माहिती मार्केट यार्डातील पालेभाज्यांचे व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
हेही वाचा… पिंपरी महापालिकेच्या १०५ शाळांमध्ये अवघे आठ क्रीडा शिक्षक
किरकोळ बाजारात एका जुडीची विक्री दहा ते पंधरा रुपये दराने केली जात आहे. यंदा परतीचा पाऊस कमी झाल्याने कोथिंबिरीची प्रतवारी चांगली आहे. कोथिंबिरीची लागवड चांगली झाल्याने आवक वाढून दरात घट झाली आहे. पुढील पंधरा ते वीस दिवस कोथिंबिरीचे दर स्थिर राहतील, असे त्यांनी सांगितले.
मेथी स्वस्त
पितृपक्षात मेथीचे दर तेजीत होते. नवरात्रोत्सवात मेथीचे दर टिकून होते. लातूर जिल्ह्यातून मेथीची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून, बाजारात दररोज एक लाख जुडींची आवक होत आहे. मेथी, कोथिंबिरीला गृहिणींकडून सर्वाधिक मागणी असते. मेथी, कोथिंबिरीचे दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात मेथीच्या शेकडा जुडींना ५०० ते ८०० रुपये दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या मेथीच्या एका जुडीचे दर दहा ते पंधरा रुपयांपर्यंत आहेत, असे पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.