पारितोषिकांपेक्षा व्यावसायिक यश महत्त्वाचे
पिंपरी : हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटातही भव्यता येऊ लागली असून करोनानंतरच्या काळात मराठी चित्रपटांना रसिक प्रेक्षकांकडून पूर्वीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळू लागला आहे, असे लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. पारितोषिके मिळण्यापेक्षा चित्रपटांना व्यावसायिक यश मिळणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
तरडे म्हणाले, एकाच धाटणीचे सिनेमे पुन्हा कधी करायचे नाहीत, हे सूत्र ठरवले आहे. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ नंतर अनेक निर्मात्यांची मागणी असतानाही तशा पद्धतीच्या चित्रपटांचे प्रस्ताव नाकारले. बक्षीस, पारितोषिके डोळय़ासमोर ठेवून सिनेमा करायचा नाही. व्यावसायिकदृष्टय़ा सिनेमा यशस्वी झाला पाहिजे व अधिकाधिक प्रेक्षकांनी तो पाहिला पाहिजे, अशी माझी सुरुवातीपासून भूमिका आहे. चित्रपटच दमदार असेल तर ‘प्राइम टाइम’साठी झगडावे लागत नाही. सिनेमागृहातून प्रस्थापित कलाकारांचे चित्रपट उतरवून मराठी चित्रपट लावण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत, हे सध्याचे चित्र खूपच आशादायी आहे.