गेल्या काही दिवसांपासून बीए.४ आणि बीए.५ या ओमायक्रॉनच्या प्रकारांचे रुग्ण वाढत आहेत. १ ते ७ जुलै या आठवड्यात पुणे जिल्ह्यात तब्बल ६१९४ नवीन रुग्णांची भर पडली असून ही वाढ तब्बल १७ टक्के आहे. जिल्ह्यातील चार रुग्णांचा करोनाने मृत्यूही झाला आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्याने बहुसंख्य रुग्ण घरच्या घरी बरे झाले आहेत, मात्र तरी गाफिल न राहण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत.
जानेवारी २०२२ मध्ये करोनाचा ओमायक्रॉन हा प्रकार नव्याने दाखल झाला आणि त्यातून राज्यासह देशभरात करोना संसर्गाची तिसरी लाट येऊन गेली. त्यानंतर करोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यातून सर्व प्रकारचे निर्बंध दूर होऊन जनजीवन पूर्वपदावर आले. त्यामुळेच करोना संसर्ग संपला असा दिलासा नागरिकांना मिळाला. गेल्या काही दिवसांत ओमायक्रॉनचे प्रकार बीए.४ आणि बीए.५ यांमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसण्यास सुरुवात झाली. ही वाढ सुरु झाल्यानंतर प्रथमच पुणे जिल्ह्यात या आठवड्यात ६१९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी ३,४०८ रुग्ण पुणे शहरात आहेत. शहरात तब्बल २२ टक्के वाढ दिसून येत आहे. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १,४२८ नवे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिपंरी चिंचवडमधील रुग्णसंख्येत २९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या उर्वरित भागात १३२८ नवे रुग्ण आढळले असून एक रुग्ण दगावला आहे. ही वाढ सुमारे आठ टक्के एवढी आहे.
दरम्यान, सर्दी, खोकला, ताप ही सर्वसाधारण फ्लू सारखी लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येने बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येत आहेत. औषधोपचार आणि विश्रांती एवढ्याने रुग्ण बरेही होत आहेत. त्यामुळे सरसकट चाचण्या करण्याचा आग्रह धरला जात नाही. मात्र, ज्या कुटूंबात सहव्याधीग्रस्त नागरिक आहेत, लहान मुले आहेत त्यांच्या चाचण्या करत आहोत. रुग्णांनी आपल्याला झालेला संसर्ग इतरांना संक्रमित होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. घरात वृद्ध, लहान मुले, रक्तदाब, मधुमेह आणि इतर जोखमीचे आजारांचे रुग्ण असल्यास जागरुक राहण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.