आपल्या देशात वर्षभर अनेक सण उत्सव साजरे केले जातात. यामध्ये हजारो कोटय़वधी रूपयांची उलाढाल होत असते. मात्र यंदा करोनाच्या संकटामुळे मागील पाच महिन्यांपासून सर्व सण उत्सव घरीच साजरे करावे लागत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव देखील घरीच आणि साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी पुण्यात जवळपास ८५० कोटींच्या आसपास उलाढाल होत असते. मात्र यंदा करोनामुळे २०० कोटींवर उलाढाल होण्याची शक्यता असल्याचे गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी सांगितले आहे. करोनामुळे गणेशोत्सवाशी निगडित असलेल्या व्यापारी वर्गावर विपरीत परिमाण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद सराफ म्हणाले की, गणेशोत्सवाला १२५ वर्षाहून अधिक काळाची परंपरा आहे. या दरम्यान प्लेग ते आताच्या करोना विषाणूंचा संसर्ग यामध्ये प्रत्येक काळात सर्वांनी लढा देण्याचे काम केले आहे. त्यामध्ये आपण सर्व यशस्वी देखील ठरलो असून यामध्ये गणेशोत्सवाने महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे आजपर्यंत पाहण्यास मिळाले आहे. तसेच, यंदाचा गणेशोत्सव देखील एक दिशा देण्याचे काम करेल आणि आपण लवकरच करोना सारख्या महामारीवर निश्चित मात करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच, मी गणेशोत्सव काळात शहरातील अनेक भागातील मंडळे, दुकानदार, व्यापारी, कामगार यांच्या संपर्क येत असतो. यंदा देखील अनेकांशी बोलणे झाले आहे. सध्याची परिस्थिती खूप गंभीर असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले आहे. त्या सर्वांचा परिणाम गणेशोत्सवाशी निगडित असलेल्या व्यवसायांवर यंदा दिसून येणार असल्याचे ते म्हणाले.

देशभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात दरवर्षी गणेश उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून हजारो कोटय़ावधी रूपयांची उलाढाल होत असते. गतवर्षी गणेशोत्सवाच्या काळात देशभरात जवळपास ४० हजार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती एका आकडेवारीवरून समोर आली आहे. यामुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळण्यास मदत होते. मात्र यंदा करोना महामारी अनेकांच्या हाताच रोजगार गेला आहे. तर बाजारपेठ अद्यापही ठप्प आहे. यामुळे गणेशोत्सवावर अवलंबून असलेल्या व्यापारी, कामगारांचे जगणे कठीण झाले आहे. त्याबाबत सांगायचे झाल्यास दरवर्षी पुणे शहरात अनेक भागातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. यातून जवळपास ८५० कोटींची उलाढाल होते. मात्र यंदा गणेशोत्सवाशी निगडित असलेल्या व्यापारी वर्गाला करोनाचा फटका बसला असून ८५० कोटींहून हिच उलाढाल २०० कोटींवर आल्याचे दिसत आहे. त्यामुळे यापुढील काळ व्यापारी वर्गाचा कसा जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्थेची घडी पाहिल्या सारखीच बसण्यासाठी थोड काळ जाईल. मात्र या घटकाच्या पाठीशी समाजातील प्रत्येकाने उभा राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच ते पुढे म्हणाले की, या करोनाच्या काळात पुणेकर नागरीक कामगार वर्गाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. हे आपण सर्वांनी पाहिले आहे. आता आपल्या शहरातील व्यापार कसा उभा राहील, याकडे सर्वांनी पाहण्याची गरज आहे. तसेच, एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात राज्य सरकारने खंबीरपणे व्यापारी वर्गाच्या पाठीशी उभा राहण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

पुणे शहरात ३० हजारांहून अधिक गणेश मंडळं-
ज्या पुणे शहरातून गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्या उत्सवाचे स्वरुप आजच्या घडीला भव्य दिव्य झाले आहे. शहरात साडेचार हजार गणेश मंडळाची नोंद, तर सोसायटी व नोंदणी नसलेले मंडळं अशी मिळून जवळपास ३० हजाराहून अधिक गणेश मंडळं पुणे शहरात आहेत.

घरगुती गणेशोत्सवावर परिणाम होणार नाही –
यंदा करोनामुळे गणेश उत्सवा दरम्यान भव्य दिव्य मंडप नसणार, मिरवणूक काढता येणार नाही. दररोजची खरेदी करणे शक्य नसणार. बाजारपेठ ठप्प झाल्याने मंडळांना वर्गणी मागणे देखील अशक्य झाले आहे. व्यापाऱ्यांकडे पैसे नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. यामुळे उत्सव साजरा करण्यावर अधिक मर्यादा आल्या आहेत. मात्र घरगुती उत्सवावर याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याचे आनंद सराफ यांनी सांगितले आहे.