करोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या देशातील अनेक कार्यक्रम,परीक्षा आणि लग्न सोहळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये लग्न सोहोळ्यांसाठी एक नियमावली करण्यात आली असून त्या नुसार लग्न समारंभ पार पडत आहेत. आज पुण्यातील हडपसर भागात माजी पोलीस अधीक्षक मनोहर चिखले यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी ते म्हणाले की, आपण करोना विषाणूच्या संकटातून लवकरच बाहेर पडू, मात्र आज ज्या प्रकारे मोजक्या लोकांमध्ये विवाह पार पडत आहे. असेच विवाह करोना संकट टळल्यानंतर भविष्यात देखील पार पाडावेत.
शुभ मंगल सावधान आजवर आपण प्रत्येकाने लग्न समारंभात म्हणताना ऐकले आहे. मात्र आता करोना विषाणूमुळे मागील दोन महिन्यापासून संपूर्ण जग प्रत्येक पाऊल खर्या अर्थाने सावधानतेने टाकताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात वाढत्या करोना विषाणूच्या रुग्ण संख्येमुळे अनेक कार्यक्रम, शाळा – महाविद्यालयांच्या परीक्षा, लग्न सोहळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. पण त्याच दरम्यान अनेक भागात लग्न सोहोळे शासनाने दिलेल्या नियमानुसार पार पाडले जात आहेत. असाच एक विवाह सोहळा पुण्यातील हडपसर येथील ओरिएंट गार्डन मधील सोसायटीमध्ये, मुलीच्या दारात एकदम साध्या पध्दतीने चिखले आणि काशिद या कुटुंबात पार पडला आहे.
मुलगी वर्षा चिखले ही एका बँकेत, तर मुलगा गौरव काशिद हा आयटी कंपनीत कामाला आहे. या दोघांचा विवाह सोहळ्याची तारीख तीन महिन्यांपुर्वी निश्चित झाली होती. मात्र त्यानंतर महिन्याभराच्या कालावधीनंतर करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे कोणतेही कार्यक्रम घेता येणार नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर चिखले आणि काशिद कुटुंबासमोर आता लग्न समारंभ केव्हा आणि कसा पार पडायचा असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर दोन्ही कुटुंबात चर्चा झाल्यानंतर ठरलेल्या तारखेनुसार 17 मे रोजी विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार आज मुलीच्या दारात सर्व विधी साध्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी येणार्या पाहुण्यांना मास्क आणि सॅनिटायझर बॉटलमधून फवारणी करून प्रवेश दिला जात होता. नव वधू आणि वराने देखील मास्क घातला होता. तर पाहुण्यांनी सोशल डिस्टंन्सिंगचे देखील पालन केल्याचेही यावेळी पहावयास मिळाले आहे.
मुलीचे वडील मनोहर चिखले हे माजी पोलीस अधीक्षक असून त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले , करोना विषाणूमुळे जगभरात एक दहशत निर्माण झाले आहे. हा आजार नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. शासनाने लग्न सोहोळ्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी अटी देखील दिल्या असून त्या नियमांचे पालन करून आज सोहोळा पार पडला आहे. अगदी मोजक्या लोकांमध्ये विवाह झाल्याने खर्च वाचला आहे. माझ्यासह अनेक मुलीच्या वडिलांचा खर्च मागील दोन महिन्यात वाचला आहे. त्यामुळे भविष्यात देखील कमी लोकांमध्ये लग्न समारंभ पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.