coronavirus door to door vaccination drive in Pune: करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हर घर दस्त मोहीम पुन्हा राबविण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन तसेच दूरध्वनी आणि लघुसंदेशाच्या माध्यमातून लसीकरण न झालेल्या नागरिकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार शहरात करोना प्रतिबंधक लसीकरण गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आले. आघाडीच्या क्षेत्रातील कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्राबरोबरच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या ज्येष्ठांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण सुरू झाले. त्यानंतर लसीकरणाला गती देण्यासाठी महापालिकेने करोना संसर्ग कालावधीत हर घर दस्तक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत १८ वर्षांपुढील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत होते.
करोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाल्यानंतर ही मोहीम काही प्रमाणात थंडावली. मात्र सध्या महापालिका क्षेत्रात तब्बल साडेचार लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नसल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. त्यातच करोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात पुन्हा वाढत असल्याने या मोहिमेला पुन्हा गती देण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
शहरातील करोना संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिका-यांचा या पथकात समावेश आहे. लसीकरण न झालेल्या आणि वर्धक मात्र न घेतलेल्यांचे समुपदेशन पथकाकडून केले जाणार आहे. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तसेच दूरध्वनी आणि लघुसंदेश पाठवून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले जाणार आहे, अशी माहिती लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.