मलेशिया येथे गेलेले कुटुंब पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले आहे. त्यांना विरोध करणाऱ्या सोसायटी धारकांनी मवाळ भूमिका घेत त्यांना सोसायटीत प्रवेश दिला आहे. परंतु, ते राहत असलेल्या मजल्यावरील शेजारील कुटुंबाने मात्र दूर राहायचे ठरवले असून ते इतर ठिकाणी निघून गेले आहेत, अशी माहिती तेथील सोसायटीधारकांनी दिली आहे. त्यामुळे सोसायटीत राहणाऱ्यांच्या मनात अद्याप भीती असल्याचं दिसत आहे.

महिला दिनाच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील सहा जणांचे उच्चशिक्षित कुटुंब हे मलेशियाला पर्यटनासाठी गेले होते. तेव्हाच, आपल्या येथे करोनाने शिरकाव केला, दरम्यान, याच काळात सोसायटी धारकांनी सांगवी पोलिसांची भेट घेऊन मलेशियाला गेलेल्या कुटुंबाला सोसायटीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर सोसायटी धारकांनी यु-टर्न घेत आम्ही पोलिसांकडे काही शिफारशी आल्या आहेत का हे विचारण्यासाठी गेलो होतो असे घुमजाव केले. मात्र, याचवेळी संबंधित कुटुंब विमानतळाहून वैद्यकीय तपासात निगेटिव्ह आले आणि त्यानंतर १४ दिवसांच्या काळात त्यांना करोना झाला? अन् त्यावेळी सोसायटीमधील संपर्कात आलेल्या व्यक्तींना करोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला होता.

मलेशियाला गेलेले कुटुंब हे रविवारी पहाटे पिंपरी-चिंचवडमधील त्या सोसायटीत परत आले आहे. त्यांना कोणी विरोध केला नाही. मात्र, सोसायटी धारकांची धुसफूस सुरूच आहे. कायद्याच्या धाकाने ते गप्प असल्याचे दिसत आहे. परंतू, मलेशियाला गेलेले कुटुंब ज्या मजल्यावर राहत आहे तेथील शेजारी मात्र भीतीपोटी बाहेरगावी गेले आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्या कुटुंबाला फोनवरून मदत विचारली जात आहे. मात्र, भीतीपोटी प्रत्यक्षात कोणीच भेटत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Story img Loader