– कृष्णा पांचाळ 

घरात आई, वडील आणि तो….समाजकार्य करण्याची पहिल्यापासून आवड, करोनामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तींना करोनामुक्त तरुण दररोज अन्नदान करायचा. मात्र, हे करत असताना त्याला करोना विषाणूची बाधा झाली. शिवाय त्याच्या आईलाही करोना झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र, न डगमगता त्याने ५२ वर्षीय आईला समजावून सांगत उपचार घेण्यास तयार केलं. तर वडिलांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने तो समाधानी होता.

दोघे ही एकाच रुग्णालयात उपचार घेत होते. आईसाठी त्याचा जीव कासावीस होत होता. दोघांचे वार्ड ही वेगळे होते. परंतु, १४ दिवसांच्या अहवालानंतर दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले अन्अ माय लेकरांनी करोनावर मात केलीय. दोघे ही आता कोरोनामुक्त झालेले आहेत.

माय लेकरांना एका दिवसाच्या अंतराने करोनाने गाठलं. आईचं वय जास्त असल्याने मुलाला काळजी वाटत होती. तर आईचं सर्व लक्ष हे मुलावर होतं. दोघांचे वार्ड वेगळे असल्याने मन रमत नव्हतं. परंतु, डॉक्टर्स आणि तेथील असलेल्या स्ट ने खूप सहकार्य करत उपचार केले अस २९ वर्षीय करोनामुक्त तरुणाने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितलं.

गेट असल्याने एकमेकांच्या वार्डमध्ये माय लेकरांना जाता येत नव्हतं. त्यामुळे दोघे ही समोरासमोर असून भेटू शकत नव्हते. अवघ्या दहा फुटांच अंतर ओलांडण मुलाला आणि आईला शक्य नव्हतं. कधी कधी दहा फुटांच्या अंतरावरून ते एकमेकांना बोलत होते. तो आईच्या प्रकृतीची विचारणा करत असे. असं साधारणपणे १४ दिवस सुरू होतं. ते एकमेकांना प्रोत्साहन देण्याचं काम करत होते. त्यामुळेच १४ दिवसानंतर दोघांची करोना चाचणी निगेटिव्ह आली.

यावेळी २९ वर्षीय करोनामुक्त तरुण म्हणाला की, नागरिकांनी कोरोना झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. डॉक्टर्स दिवसरात्र आपल्यासाठी काम करत आहेत. तर अनेक नागरिक बाहेर निघत नाहीत लपून बसलेली आहेत. त्यांनी बाहेर निघावं जेणे करून पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही बरे व्हाल. उशीर केला तर तो जीवावर बेतू शकतो, असं आवाहनही त्याने नागरिकांना केले. तसेच स्वतःमध्ये काही बदल जाणवत असतील तर डॉक्टरांकडे जावं आणि उपचार घ्यावेत. आपल्यामुळे इतरांना कोरोना होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे.