सध्या जगभरासह देशभरात करोना व्हायरसने एक दहशत निर्माण केली आहे. दिवसेंदिवस देशाताली करोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. महाराष्ट्राचा यामध्ये अव्वल क्रमांक आहे. त्यात प्रामुख्याने मुंबई व पुणे ही दोन महत्वाची शहरं आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी 21 दिवासांसाठी लॉकडाउनची घोषणा केलेली आहे. तर प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना तर अहोरात्र कर्तव्यावर राहावं लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांचा जीवही कायम टांगणीला लागलेला असतो. असाच एक अनुभव पुणे शहरात पाहायला मिळाला आहे.

पुणे पोलीस विभागात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या प्रेमा पाटील यांना त्यांच्या चिमुकल्याने कामावर जाण्यापासून रोखण्याचा बाल हट्ट केला आहे. रणविजय नाव असलेल्या या तीन वर्षाच्या चिमुकल्याने आपली आई एवढ्या भयानक परिस्थितीतही कर्तव्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे पाहून तिला घरीच थांबवण्याचा केलेला प्रयत्न सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे.

हातामध्ये वर्दीचा बेल्ट घेऊन रणविजया आईला म्हणतो तू बाहेर जाऊ नको,  मी तुला जाऊ देणार नाही. बाबा,  आजी सर्व घरीच आहेत तू घरीच थांब. आपल्या चिमुकल्याच्या या शब्दांनी प्रेमा पाटील यांच्यातील आईजरी काही क्षणासाठी विचारात पडली असली तरी त्यांच्याती सहायक पोलीस निरीक्षक मात्र त्यांना कर्तव्यावर जाण्यास सांगते. म्हणू त्या देखील आपल्या बाळाची समजूत काढतात. आपला बेल्ट मागत त्या म्हणतात माझा बेल्ट दे रे बाळा, काही लोकांना त्यांच्या घरी थांबविण्यासाठी मला बाहेर जावेच लागेल. आई व लेकरातील अशाच प्रकारचा संवाद मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हे पाहता नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून घरता थांबणं आवश्यक आहे. कारण आपण घरात राहावं म्हणून कुणीतरी त्याच्या कुटुंबाला सोडून आपले कर्तव्य बजावण्यसाठी जीव धोक्यात घालून घराबाहेर रोज पडत आहे. प्रेमा पाटील ह्या त्यांच्यापैकी एक आहेत. असा संवाद पोलिस विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या घरात रोज  होत असेल, त्यांच्यापैकी एक प्रेमा पाटील यांच्याशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे.

यावेळी प्रेमा पाटील म्हणाल्या की, करोना व्हायरस या आजाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अगदी सुरुवातीच्या काळापासून शहरातील नागरिकांच्या दृष्टीने विशेष काळजी घेत आहे. तेव्हापासून आमच्या घरात देखील या आजाराबाबत चर्चा सुरू आहे. आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. हे सर्वांना माहिती असून त्याप्रमाणे आम्ही घरात राहतो. देशभरात लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून घरी सर्व जण आहेत. पण मी पोलीस विभागात सेवेत असल्याने,  मला कामावर जावे लागे. त्यावेळी माझा तीन वर्षाचा मुलगा रणविजय म्हणतो,  मला घरीच थांबण्याचा हट्ट करतो अशावेळी मला त्याची समजूत काढून कामावर जावे लागते. कर्तव्यावर असताना व घरी आल्यावरही आम्ही करोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून करण्यात आलेल्य सर्व सूचनांचे पालन करतो.

आम्ही सर्व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तुमच्या सर्वांसाठी पुढे येऊन काम करत आहोत. हे सर्वांनी लक्षात ठेवून किमान पुढील काही दिवस घरी बसून, करोना व्हायरसला हद्दपार करू यासाठी सर्वजण मिळून संकल्प करुयात असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

Story img Loader