वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या पिंपरीतील बहुखर्चिक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांची ‘चमकोगिरी’ हा साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. संमेलनाचे आयोजक झाल्यापासून आजपर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे संपत्तीचे प्रदर्शन आणि सगळीकडे झगमगाट असाच दिसून येतो. त्यामुळे हे संमेलन साहित्य महामंडळाचे की स्वागताध्यक्षांचे असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८९ वे साहित्य संमेलन पिंपरीला होणार आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील त्याचे स्वागताध्यक्ष असणार, हे जाहीर झाले तेव्हाच हे साहित्य संमेलन अतिभव्य आणि थाटामाटात होणार असल्याचे स्पष्ट होते. त्याची प्रचिती प्रत्येक दिवशी आणि संमेलनाच्या एकेका टप्प्यावर येत आहे. संमेलनाला ‘कार्पोरेट लूक’ आल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. संमेलनाच्या अंतिम तयारीकडे पाहता आतापर्यंतच्या सर्व संमेलनापेक्षा सर्वाधिक खर्च होणारे हे संमेलन ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांत, दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये संमेलनाच्या जाहिराती झळकत आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठे होर्डिग लागले आहेत. त्या माध्यमातून पाटील सगळीकडे झळकत आहेत. उर्वरित तीन दिवसांत यात भरच पडणार आहे.
डॉ. पाटील यांचा पिंपरी-चिंचवड शहराशी खूप वर्षांपासून जवळचा संबंध आहे. येथील बहुतांश नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा थेट परिचय आहे. शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून असलेले त्यांचे अनेक लाभार्थी शहरातील विविध भागात मोक्याच्या ठिकाणी आहेत. ते स्वागताध्यक्ष झाल्याचा अपार आनंद त्यांना झाला. त्यातून अनेक संस्था-संघटनांतर्फे त्यांचे जागोजागी सत्कार सुरू झाले. दापोडी या मूळ गावामध्ये तर खेळ लावून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यामागे प्रत्येकाची वेगवेगळी गणिते असल्याचे बोलले जाते. काहींचे या माध्यमातून डॉ. पाटील यांच्याशी जवळीक साधून भविष्यातील लाभ पदरात पाडून घेण्याचे नियोजन आहे. तर, काहींना संमेलनाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे होते. एका सत्कारानिमित्त घेतलेल्या मुलाखतीमुळे त्यांची काहीशी अडचण झाली होती. मात्र, सावधगिरी बाळगून त्यांनी प्रकरण वाढू दिले नाही. मात्र, स्वागताध्यक्षांनी घेतली तशी खबरदारी संमेलनाध्यक्षांनी घेतली नाही म्हणून संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे संमेलनाध्यक्षांपेही स्वागताध्यक्ष वरचढ ठरल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा