संपूर्ण शहरभर पडलेल्या खड्डय़ांच्या विरोधात जोरदार ओरड सुरू झाल्यामुळे महापालिका प्रशासनालाही आता जाग आली असून रस्त्यांवरील खड्डे तीन दिवसात दुरुस्त होतील, असे आश्वासन प्रशासनातर्फे शुक्रवारी खासदार वंदना चव्हाण यांना देण्यात आले.
शहरातील खड्डय़ांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून खड्डय़ांमध्ये टाकण्यात आलेली डांबरमिश्रित खडी रस्त्यांवर सर्वत्र पसरली आहे. खड्डय़ांच्या विरोधात राजकीय पक्षांची आंदोलनेही सुरू झाली आहेत आणि पुणेकरांकडूनही प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. मुळातच ज्या ज्या रस्त्यांवर काही ना काही कारणांनी कामे करण्यात आली ती कामे पूर्ण झाल्यानंतर खड्डे शास्त्रीय पद्धतीने बुजवण्यात न आल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याची टीका स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
खड्डय़ांच्या या प्रश्नावर खासदार वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापौर वैशाली बनकर, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, सभागृहनेता सुभाष जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ विभागाचे प्रमुख प्रमोद निरभवणे आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पावसाने उघडीप दिल्यामुळे खड्डे दुरुस्तीची कामे दिवसा व रात्रीही केली जात आहेत. उघडीप कायम राहिल्यास तीन दिवसात खड्डे बुजवण्याचे आणि रस्ते पूर्ववत करण्याचे काम पूर्ण होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी या बैठकीत केला. दुरुस्तीकामांसाठी शहराचे चार विभाग करण्यात आले असून अधिकाऱ्यांचीही पथके तयार करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
पावसाचे पाणी साचून रस्त्यांना खड्डे पडतात. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल असे रस्त्यांचे आरेखन तयार करणे आवश्यक आहे. या दूरगामी उपाययोजनेबाबत पंधरा दिवसांनी बैठक घेण्यात येणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी या वेळी सांगितले. दिलेल्या हमीमध्येही ज्या ठेकेदारांचे रस्ते खराब झालेले असतील, त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तसेच ज्यांचे काम दर्जेदार झालेले नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे या वेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
पालिकेचे अधिकारी म्हणतात, खड्डे तीन दिवसात दुरुस्त करणार
रस्त्यांवरील खड्डे तीन दिवसात दुरुस्त होतील, असे आश्वासन प्रशासनातर्फे शुक्रवारी खासदार वंदना चव्हाण यांना देण्यात आले.
आणखी वाचा
First published on: 27-07-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporation commit to repair potholes within 3 days