संपूर्ण शहरात पाणीकपात सुरू असताना आणि पुणेकरांना पाणी वाचविण्याचे आवाहन केले जात असताना वाया जाणाऱ्या पाण्यावर तसेच वॉशिंग सेंटरमधील पाण्याच्या गैरवापरावर मात्र महापालिकेचे अधिकारी कारवाई करत नसल्याचा प्रकार मंगळवारी कोथरूडमध्ये उघड झाला. पाण्याच्या गैरवापरावर कारवाई न करता मी इथे नवीन आहे अशी उत्तरे संबंधित कर्मचारी व अधिकारी नगरसेवकांना देत होते.
कोथरूड उड्डाणपुलाजवळ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत केदार एम्पायर ही अकरा मजली इमारत उभी करण्यात आली असून तेथील पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत स्थानिक नगरसेवक प्रशांत बधे आणि नगरसेवक बाळासाहेब बोडके हे जागेवर जाऊन नागरिकांशी चर्चा व पाहणी करत होते. ही पाहणी सुरू असताना याच इमारतीमध्ये अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे अक्षरश: धबधबे सुरू होते. तसेच पाण्याचा मोठा अपव्यय सुरू होता. दोन तास होऊनही हे पाणी थांबेना म्हणून अखेर बधे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली.
या तक्रारीनंतर महापालिकेच्या उपद्रव शोधपथकाचे अधिकारी व कर्मचारी जागेवर दाखल झाले. मात्र, त्यातील कोणीही कारवाईच्या मन:स्थितीत नव्हते. याच इमारतीमध्ये असलेल्या वाहनउद्योगासाठीही पाण्याचा बेसुमार वापर होत असल्याचे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जागेवर नेऊन दाखवून दिले. तसेच हे सर्व नळाचे पाणी असून वर्षांनुवर्षे असा वापर होत असूनही कारवाई का करत नाही असा प्रश्न बोडके यांनी विचारल्यानंतर आम्ही कुठे कुठे कारवाई करणार, आम्ही नवीन आहोत, असे सांगू लागले. या प्रकारानंतर वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे काही अधिकारी जागेवर आले. पाण्याचा गैरवापर कोणाकडून सुरू आहे त्याची माहिती त्यांना नगरसेवकांनी दिल्यानंतरही संबंधित अधिकारीही आम्ही येथे नवीन आहोत, अशी उत्तरे बोडके आणि बधे यांना देत होते.
अधिकारी कारवाई करत नाहीत हे लक्षात आल्यानंतर मी त्याच ठिकाणी थांबून राहिलो. अखेर इमारतीतील एक नळजोड तोडण्याची कारवाई दुपारी चार वाजता करण्यात आली, अशी माहिती बधे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा