शालेय विद्यार्थ्यांना योगासने व सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून देण्यासाठी िपपरी महापालिकेने पुढाकार घेतला असून त्यासाठी नव्या क्रीडा धोरणात विशिष्ट कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, क्रीडा विकासात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवणे, क्रीडा साहित्यासाठी अनुदान देणे, चित्रीकरणासाठी पालिकेच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे यासारखे अनेक निर्णय क्रीडा समितीने या अंतर्गत घेतले आहेत.
महापालिका आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर डॉ. श्रीकर परदेशी यांनी क्रीडा धोरण तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, त्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून, चर्चा करून याबाबतचे धोरण निश्चित करण्याचे काम सुरू होते. क्रीडा समितीच्या सभापती वनिता थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वेळी नगरसेवक वैशाली काळभोर, संपत पवार, नीलेश पांढारकर, विशेष क्रीडा अधिकारी सुभाष माछरे, रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते. पालिका सभेत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिका परिसरात १० केंद्रे तयार करणे, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे, क्रीडा शिक्षक व खेळाडूंना उच्च पदावरील सेवेतील संधी उपलब्ध करून देणे, पालिकेकडील सुविधांचा लाभ खेळाडूंना करून देणे, शासकीय जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, खेळाडूंना प्रोत्साहनपर पारितोषिके देणे, क्रीडा दिन तसेच क्रीडा सप्ताह साजरा करणे, खेळाडूंना अल्पदरात वैद्यकीय सुविधा देणे, वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक साहाय्य करणे, साहसी क्रीडा प्रकारांना उत्तेजन देणे, खेळाडू दत्तक योजना राबवणे, महापौर चषक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना आर्थिक साहाय्य करणे, क्रीडा वाङ्मय निर्मिती करणे आदींचा नव्या क्रीडा धोरणात समावेश करण्यात आला आहे.