महापालिकेच्या खर्चातून यापुढे वर्षभरात फक्त पाचच महोत्सव साजरे करण्याचा निर्णय मंगळवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या काही वर्षांत अनेक नगरसेवक महापालिकेच्या पैशांतून आपापल्या भागात विविध महोत्सव साजरे करत होते. यापुढे मात्र महापालिकेच्या आयोजनातूनच पाच महोत्सव साजरे केले जातील.
सभागृहनेता सुभाष जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवांवर होणाऱ्या खर्चाबाबत वारंवार आक्षेप घेतले जात असून या महोत्सवांमुळे वादंगही होतात. त्यामुळे पुढील वर्षांच्या (२०१३-१४) अंदाजपत्रकात दहा ते बारा महोत्सवांसाठीच तरतूद करण्यात आली आहे. मात्र, तेवढे महोत्सव न करता पुढील वर्षांत फक्त पाच महोत्सव साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्षनेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, शनिवारवाडा महोत्सव (गणेशोत्सव), श्रीशिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि मौलाना अबुल कलाम आझाद जयंती हे पाच महोत्सव यापुढे महापालिका साजरे करेल. या महोत्सवांच्या ठिकाणी कशा प्रकारे फ्लेक्स लावावेत, महोत्सवांची निमंत्रणपत्रिका कशी असावी, महोत्सव कशा पद्धतीने साजरा व्हावा यासंबंधीचे धोरण निश्चित केले जाणार असून महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक संस्था वा नगरसेवक वा अन्य राजकीय कार्यकर्ते, पक्ष यांना कोणतेही फलक लावता येणार नाहीत. असे फलक उभारल्यास ज्या ठेकेदाराला महोत्सवाचे काम दिले असेल, त्यालाच हे फलक काढून टाकण्याचेही अधिकार दिले जाणार आहेत.