अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रबोधनाच्या चळवळीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलेल्या कार्याचा बहुमान करण्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. पुणे महापालिकेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
महापालिकेतील सभागृहनेता सुभाष जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे हेही या वेळी उपस्थित होते. महापालिकेच्या पक्षनेत्यांची बैठक गुरुवारी बोलावण्यात आली होती. या बैठकीत पुरस्काराचा निर्णय घेण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळीत लक्षणीय योगदान असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार गेल्यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार नामदेव ढसाळ यांना प्रदान करण्यात आला होता. डॉ. रावसाहेब कसबे आणि रामनाथ चव्हाण यांच्यासह सर्व पक्षनेते व पदाधिकारी डॉ. आंबेडकर पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत. एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ. दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि लोकप्रबोधनासाठी जे कार्य केले ते आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलेच कार्य होते. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. डॉ. हमीद दाभोलकर यांनी महापालिकेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संमती दिली असल्याचेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा