पीएमपीचा पदभार स्वीकारल्यांतर डॉ. श्रीकर परदेशी यांचे सक्षम नेतृतव मिळाल्यामुळे पीएमपी प्रगतिपथावर जाईल, असा विश्वास आजी-माजी नगरसेवकांनी व्यक्त केला असून नगरसेवक आणि काही सामाजिक कार्यकर्ते पीएमपीसाठी रोज वेळ देऊन आवश्यक ती मदत व सहकार्य करण्यास पुढे आले आहेत.
माजी नगरसेवक आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. परदेशी यांचे नेतृत्व पीएमपीला मिळाल्यामुळे संस्था प्रगतिपथावर जाईल तसेच पुणेकरांना कार्यक्षम वाहतूक सेवेचा लाभ मिळेल. तसेच पीएमपी प्रशासनाने काही आवश्यक निर्णय घेतल्यास ते संस्थेच्या हिताचे ठरेल, असे तिवारी यांनी सांगितले. नगरसेवक आणि पीएमटीचे माजी अध्यक्ष संजय बालगुडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री, माजी नगरसेवक श्याम मानकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पीएमपीसाठी रोज वेळ देऊन आवश्यक सहकार्य-मदत करण्याची तयारी दर्शवली असल्याचेही तिवारी म्हणाले.
पुणे आणि पिंपरी या दोन शहरांबरोबरच पीएमपीची सेवा जिल्ह्य़ात पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत दिली जाते. हवेलीतील अनेक गावांनाही पीएमपीची सेवा आहे. या भागात पीएमपीची सेवा दिली जात असल्यामुळे तेथील ग्रामपंचायती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेने पीएमपीच्या तुटीतील काही वाटा उचलावा, अशी सूचना तिवारी यांनी केली आहे. पुणे व पिंपरी महापालिकांकडून ज्या पद्धतीने पीएमपीच्या तुटीतील काही वाटा उचलला जातो तशाच पद्धतीने ग्रामीण भागात सेवा दिली जात असल्यामुळे असा वाटा उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पीएमपीमधील इंटक कामगार संघटनेनेही काही मागण्या केल्या असून त्यासंबंधी माहिती देताना तिवारी म्हणाले की, पीएमपीला होत असलेला तोटा हा चुकीची धोरणे, व्यवस्थापनातील त्रुटी, ढिसाळ कारभार, चोऱ्या यामुळे होत आहे. त्याला कामगार जबाबदार नाहीत. कामगारांना त्यांच्या छपन्न महिन्यांच्या फरकाची थकित रक्कम मिळणे आवश्यक असून ही रक्कम पीएमपीकडे महापालिकांनी जमा केली आहे. त्यामुळे ही रक्कम कामगारांनाच मिळाली पाहिजे. तसे आदेशही राज्य शासनाने काढले आहेत. त्यामुळे त्या रकमेचा वापर प्रशासनाने पीएमपीसाठी करू नये. इंटक कामगार आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहेत. पीएमपीसाठी अधिक कष्ट घेण्याचीही कामगारांची तयारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा