मी सन २००२ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि महापालिकेत काम करण्याची संधी मिळाली. सन २००३ साली तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार विजय काळे यांच्या पुढाकारातून महापालिकेच्या विधी समितीची अध्यक्षही झाले. सामाजिक कामाचा प्रदीर्घ अनुभव होता. परंतु विधी समितीची अध्यक्ष आणि नगरसेविका म्हणून काम करतानाही पालिका सभागृहातील अनेक ज्येष्ठ नगरसेवक त्यांची कामे करून घेण्यासाठी त्या वेळी दबाव आणत असत. मात्र, ज्येष्ठ नगरसेवक वा पदाधिकाऱ्यांनी कितीही दबाव आणला, तरी कोणत्याही दबावाला न जुमानता सामाजिक भान कायम ठेवत अध्यक्ष म्हणून काम केले, याचे आजही मला समाधान आहे.
१९८२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची कार्यकर्ती म्हणून मी काम करत आहे. १९९७ ते २००२ या काळात माझे पती उदय जोशी नगरसेवक होते. प्रभाग महिलासांठी राखीव झाल्यानंतर २००२ साली प्रभाग क्रमांक ४६ मधून मला उमेदवारी दिली गेली. काँग्रेसच्या नीता परदेशी, राष्ट्रवादीच्या दहिभाते माझ्याविरुद्ध होत्या. ही निवडणूक एकतर्फी झाली आणि मी पहिल्यांदा नगरसेवक म्हणून पालिकेत गेले.
टिळक रस्ता ते लक्ष्मी रस्ता या दरम्यान जलवाहिनेचे काम करणे आवश्यक होते. मात्र, टिळक आणि लक्ष्मी रस्ता हे पुण्याच्या मध्य भागात येणारे मुख्य रस्ते. तेथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे तेथे जलवाहिनी टाकण्याचे काम जिकिरीचे होते. तरीही या मार्गावर जलवाहिनी टाकण्याचे काम मी पूर्ण करून घेतले. सन २००३ मध्ये जम्मू येथे ऑपरेशन पराक्रम अंतर्गत झालेल्या मोहिमेत पुण्याचे कॅप्टन सुशांत गोडबोले हुतात्मा झाले. महाराष्ट्राच्या अनेक शूरवीरांनी भारतमातेसाठी बलिदान केले आहे. ती परंपरा कॅप्टन सुशांत गोडबोले यांनी कायम ठेवली. त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी आणि त्यातून पुणेकरांना प्रेरणा देण्यासाठी महाराणा प्रताप उद्यानात त्यांचे स्मारक उभी करण्याची योजना पूर्णत्वास नेली. तसेच टिळक रस्त्यालगत बागही विकसित केली. नागरिक नेहमीच विविध छोटी-मोठी कामे घेऊन येत असतात. नागरिकांची अशी अनेक छोटी-मोठी कामे केली आणि त्याचे समाधान आजही वाटते.
२००७ साली मला पुन्हा संधी मिळाली. मी नगरसेविका म्हणून केलेली कामे घेऊन प्रभाग क्रमांक ६९ मधून निवडणुकीला सामोरी गेले आणि निवडून आले. पुढे २००८-०९ साली महिला बाल कल्याण समितीची सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
शुभदा जोशी
- शुभदा जोशी यांनी नगरसेवक तसेच विधी समितीच्या अध्यक्ष, महिला बाल कल्याण समिती सदस्या म्हणूनही काम केले आहे.