पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या खेळाडू दत्तक योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून प्राप्त ९४ अर्जापैकी ८३ खेळाडू पात्र ठरले आहेत. त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या खेळाडूंना प्रतिदिनी ५० रूपये आहारभत्ता देण्याच्या तरतुदीवरून सदस्यांनी महापौरांकडे तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.
महापौर मोहिनी लांडे यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या वेळी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप आदी उपस्थित होते. क्रीडा समितीच्या सभापती वनिता थोरात मात्र अनुपस्थित होत्या. या योजनेचे गुरूवारी इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडासंकुलात महापौरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संदर्भातील तरतुदींची माहिती महापौरांनी पत्रकारांना दिली.
अॅथेलेटिक्स १५, हॉकी ९, लॉन टेनिस ११, बॉक्सींग १३, नेमबाजी ४, बॅडिमटन ५, क्रिकेट ५, जलतरण ६, कबड्डी १५ असे ८३ खेळाडू दत्तक घेण्यात आले आहेत. त्यांना सरावासाठी पुढील वर्षभर महापालिकेची विविध मैदाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या योजनेतील खेळाडूंना ५० रूपये आहार भत्ता देण्याची माहिती महापौरांनी देताच राजू मिसाळ यांच्यासह उपस्थित सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. ५० रूपयात येणार काय आणि तो खेळाडू खाणार काय, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महेश लांडगे यांनी खेळाडूंच्या दत्तक योजनेचा पाठपुरावा केल्याचे सदस्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून देत आहार भत्त्याची रक्कम वाढवावी, अशी आग्रही मागणीही केली. त्यानंतर, महापौरांनी याबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन सदस्यांना दिले.