धरणसाठय़ाची परिस्थिती आणि लांबलेला पाऊस यांचा विचार करून पाणीकपात तसेच अन्य नियोजन करण्यासाठी तातडीने मुख्य सभा बोलावावी, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली आहे. ही सभा व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला असून पक्षाचे महापालिकेतील गटनेता राजेंद्र वागसकर यांनी तसे पत्र महापौरांना सोमवारी दिले.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या निम्माच पाणीसाठा झालेला असून पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीसाठय़ात गेल्या महिनाभरात लक्षणीय वाढ झालेली नाही. या परिस्थितीचा विचार करून शहराच्या पाणीपुरवठय़ाबाबत तातडीने निर्णय घेतला जावा या मागणीने आता महापालिकेत जोर धरला आहे. ही मागणी होत असली, तरी प्रशासनाकडून अद्याप पाणीनियोजनाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिकेची खास सभा बोलावली जावी, अशीही मागणी नगरसेवकांनी केली आहे.
स्थायी समितीमधील मनसेचे सदस्य अनिल राणे, राहुल तुपेरे, आरती बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूराव कर्णे गुरुजी, भाजपचे श्रीकांत जगताप आणि शिवसेनेचे भरत चौधरी या सहा सदस्यांनी खास सभेची मागणी करणारे पत्र सोमवारी महापौरांना दिले. महाराष्ट्रात पाऊस खूपच कमी झाला आहे. पुणे शहरातही तशीच परिस्थिती आहे. असलेला पाणीसाठा जपून वापरणे, नागरिकांना त्याबाबतची माहिती देणे, नागरिकांचे सहकार्य घेणे यासाठी महापालिकेची खास सभा बोलवावी, असे या सहा सदस्यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर आणि नगरसेविका अस्मिता शिंदे यांनीही एक पत्र महापौरांना दिले असून या पत्रातून खास सभेची मागणी करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुणे शहर परिसरात आवश्यक तेवढय़ा प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठा अपुऱ्या प्रमाणात झाला आहे. अशा परिस्थितीत पुढील काळात शहराला व परिसराला पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. चारही धरणातील पाणीसाठा व त्या अनुषंगाने पुढील काळात पाणीपुरवठा कशा पद्धतीने केला जाणार आहे याचा विचार करण्यासाठी मुख्य सभेची खास सभा बोलवावी, असे या पत्रात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्याचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन सध्या शहराला पाणीपुरवठा कसा करायचा आणि पुढच्या वर्षीचे नियोजन कसे करायचे याचा विचार करून प्रशासनाने लगेचच काही निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही खास सभा बोलावण्याची मागणी केली आहे.
– राजेंद्र वागसकर
गटनेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना</span>