पिंपरी महापालिकेच्या वतीने आयोजित विशेष सर्वसाधारण सभेला नगरसेवकांनी दांडी मारल्याने बुधवारची सभा गुरुवापर्यंत तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढावली. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ही शेवटची सभा होती. त्यामध्ये ‘मतदार राजा’ला खूश करणारे अनेक प्रस्ताव मंजूर करण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी होती, मात्र नगरसेवकच न फिरकल्याने सभा तहकूब करावी लागली.

महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता सभेचे कामकाज सुरू झाले. मात्र, गणसंख्या पुरेशी नव्हती, त्यामुळे एक तास सभा तहकूब करण्यात आली. तासाभरात नगरसेवक सभागृहात दाखल होतील, असे गृहीत धरण्यात आले. काही नगरसेवकांना निरोपही धाडण्यात आले, मात्र तीन वाजता सभा सुरू झाल्यानंतरही ‘जैसे थे’ परिस्थिती होती. त्यामुळे गुरुवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंत सभा तहकूब करण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केले. सभेत माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील तसेच पालिकेचे माजी सहायक आयुक्त दिलीप बंब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे यांनी सूचना मांडली, त्यास राम पात्रे यांनी अनुमोदन दिले.

सभेच्या विषयपत्रिकेवर महापालिका करांचे दर व करेत्तर बाबींचे शुल्क निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोणतीही करवाढ न करण्याची भूमिका स्थायी समितीने यापूर्वीच घेतली होती. त्या निर्णयावर सभेत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. करवाढ न करून मतदारांना खूश करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

याशिवाय, बसेसच्या खरेदीसाठी मासिक हप्ते थेट बसपुरवठादाराच्या खात्यात जमा करण्याचा तसेच ठिकठिकाणी नवे बस डेपो उभारण्याचा विषय आहे.

Story img Loader