साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ‘आशा भोसले संगीत रजनी’ कार्यक्रमासाठी आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही नगरसेवकांना रविवारी ‘वेगळय़ा’ अनुभवाला सामोरे जावे लागले. महापालिकेचा कार्यक्रम आहे, अशा थाटात हे नगरसेवक कार्यकर्त्यांसमवेत महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेल्या दालनाजवळ आले. मात्र, त्यांच्याकडे प्रवेशिका नव्हत्या. त्यामुळे खासगी सुरक्षारक्षकांनी (बाऊन्सर्स) या नगरसेवकांना ‘घरचा रस्ता’ दाखवल्याची माहिती पुढे आली आहे.
िपपरीत सुरू असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी आशा भोसले संगीत रजनीचा कार्यक्रम होता, त्यासाठी तोबा गर्दी झाली होती. सर्व नागरिकांसाठी मोफत असलेल्या या कार्यक्रमातील काही जागा महत्त्वाच्या व्यक्ती तसेच पत्रकारांसाठी राखीव होत्या. त्यासाठी संयोजकांकडून प्रवेशिका देण्यात आल्या होत्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच या राखीव जागांवर नागरिकांनी कब्जा केला होता. संयोजकांनी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांना तेथे बसलेले नागरिक दाद देत नव्हते, पोलीसही या गर्दीपुढे हतबल झाले होते. अशी परिस्थिती असताना, आत येण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ तुडुंब गर्दी झाली होती. महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव जागा असलेल्या ठिकाणाकडे काही नगरसेवक एकेक करत येत होते, त्यांच्यासोबत कार्यकर्तेही होते. मात्र, कोणाकडेही प्रवेशिका नव्हत्या. त्यामुळे सुरक्षारक्षक कोणालाही आतमध्ये सोडायला तयार नव्हते. त्यावरून बरीच हुज्जत घातली गेली, वादंगही झाले. मात्र, जागाच नसल्याने व तुमच्याकडे प्रवेशिका नाही, असे सांगत सुरक्षारक्षकांनी ‘बाहेरचा रस्ता’ दाखवला. महापालिका व संयोजक समिती यांच्यात समन्वय नसल्याने
हा प्रकार घडला असून त्यामुळे नगरसेवक मंडळी भलतीच संतापली आहेत.