गेल्या काही वर्षांमध्ये पुणे जिल्ह्य़ात जमीन खरेदीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. या व्यवहारांमध्ये एजंट म्हणून अनेक सराईत गुंड, भामटे सक्रिय झाले असून गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडविण्यात येत आहे. ज्यांना फसवण्यात येते त्यांच्या तक्रारी ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यात घेतल्या जात नाहीत आणि तक्रारदाराला न्याय मिळत नाही. त्यामुळे आता तक्रारदारांनी थेट पाषाण येथील ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्य़ातील देहूरोड, पौड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, वडगाव मावळ, हवेली तालुका परिसर, वेल्हा, राजगड या भागात मोठय़ा प्रमाणावर जमीन खरेदीचे व्यवहार होत आहेत. जमिनीत गुंतवणूक केल्यास बक्कळ पैसे मिळतील, या आशेने अनेकांनी जमीन खरेदीत पैसे गुंतविले आहेत. मात्र यातील काही व्यवहारांमध्ये गुंतवणूकदारांना हातोहात फसविण्यात आले. जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यात तक्रारदार गेल्यास त्याच्या तक्रारीचा पाठपुरावा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पाश्र्वभूमीवर आता तक्रारदारांनी थेट ग्रामीण पोलिस मुख्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी केले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गंभीर गुन्ह्य़ांच्या तपासाचा ताण पोलिसांवर असतो. ग्रामीण पोलिसांची हद्द मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक तक्रारीचा निपटारा करणे शक्य होत नाही. यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारदारांनी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.
तक्रारदारांना न्याय मिळणार
पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली न गेल्यास तक्रारदाराचा पोलिस यंत्रणेवरचा विश्वास उडतो. पुणे जिल्ह्य़ात सध्या प्लॉटिंग करून जमिनीची विक्री करण्याचे पेव फुटले आहे. पुण्या-मुंबईतील अनेकांनी अशा योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यातील काही जणांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. तक्रारदारांनी न घाबरता आर्थिक गुन्हे शाखेत (दूरध्वनी – ०२०-२५६५ ८७८४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजीराव देवकर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा